अंबरनाथ, ता. १८ (वार्ताहर) : तालुक्यातील मोरवलीसह परिसरातील आठ ते दहा गावांतील नागरिकांनी पादचारी पुलाची तातडीची मागणी करत बुधवारी रेल्वे अधिकाऱ्यांना पाहणीदरम्यान घेराव घातला. जोपर्यंत पादचारी पूल उभा राहत नाही, तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करा अथवा हा मार्ग बंद करू नका, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
अंबरनाथ पश्चिम रेल्वे रुळाशेजारी मोरवली, भेंडीपाडा, बुवापाडा, खुंटीवली, भास्करनगर यांसह अन्य गावांत हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. कष्टकरी व सर्वसामान्य वर्ग रोजगारासाठी पूर्वेकडील आनंदनगर एमआयडीसी तसेच निसर्गग्रीन, ग्रीनसिटी परिसरात जातो. मात्र, पश्चिमेकडील रहिवाशांना पूर्वेकडे जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर पायी चालावे लागते. रोज रिक्षाने जाण्यासाठी ८० ते १०० रुपये खर्च येतो, जो घरकाम करणाऱ्या महिला, विद्यार्थी तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना परवडणारा नाही. परिणामी नागरिक रोज जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडण्यास भाग पडतात.
रुळ ओलांडण्यासाठी असलेला मार्ग बंद केल्यास त्यांची समस्या अधिकच गंभीर होईल. अपघातांचा धोका टाळण्यासाठी आणि प्रवास सोयीस्कर करण्यासाठी तातडीने पर्यायी मार्ग किंवा पादचारी पूल उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर ठेवली. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पादचारी पूल तयार होईपर्यंत मोरवली येथील मार्ग बंद करू नये अथवा रेल्वेने तातडीने पूल उभारावा, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली. यावेळी नंदकुमार भागवत, गुरुनाथ गायकर, संजय मगर, सचिन चव्हाण, सुषमा रसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पादचारी पुलासाठी रेल्वेकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, रेल्वे नागरिकांची दखल घेत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. आमचा हा मार्ग बंद करण्यास कोणताही अडथळा नाही; मात्र जोपर्यंत हा पादचारी पूल बनत नाही तोपर्यंत तरी खुला ठेवावा
- नंदकुमार भागवत, ग्रामस्थ
आम्हाला अतिशय तुटपुंजा स्वरूपाचा पगार मिळतो. त्यात रोज ८० रुपये गाडी भाडे दिल्याने उदरनिर्वाह कसा करायचा. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पादचारी पूल बनवावे. मात्र,
तोपर्यंत हा मार्ग बंद करू नये. हा मार्ग बंद झाल्यास आमच्यावर उपासमार येईल.
- हरिना भट, महिला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.