तलावांमध्ये प्रदूषणाचे ठाण
गणेश विसर्जनानंतर पालिकेला स्वच्छतेचा विसर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ ः गणेशोत्सव काळात शहरातील नैसर्गिक तलावांमध्ये पीओपीपासून तयार केलेल्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. नियमानुसार ४८ तासांच्या आत या तलावांची स्वच्छता करणे अनिवार्य होते; पण पालिकेने दुर्लक्ष केल्याने साचलेल्या गाळामुळे तलावांचा श्वास गुदमरला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ३० गावांचा समावेश करून नवी मुंबई शहर तयार करण्यात आले. नदी, नाले आणि तलाव जतन करण्याची जबाबदारी नवी मुंबई महापालिका प्रशासनाची आहे. शहरात २६ तलाव आहेत. त्यापैकी १४ तलावांचे महापालिका प्रशासनाने सुशोभीकरण केले. उर्वरित तलाव नैसर्गिक अवस्थेत आहेत. विकास केलेल्या तलावांमध्ये दगडी भिंत बांधून पाण्याचे वर्गीकरण केले आहे. तलावाच्या एका बाजूला गणेशमूर्ती विसर्जन केले जाते. तर तलावाच्या दुसऱ्या भागातील पाणी स्वच्छ राहावे, असा पालिकेचा प्रयत्न आहे; परंतु काही वर्षांपासून तलावाच्या दोन्ही भागांत गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली. सहा फुटांपर्यंत मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने शहरात १४३ कृत्रिम तलाव तयार केले होते. या तलावांची ४८ तासांत गाळ काढून स्वच्छता करणे अभिप्रेत होते; मात्र गणेशोत्सवानंतर महिना लोटल्यानंतर प्रशासनाला तलाव स्वच्छतेची आठवण झालेली नाही. परिणामी, तलाव प्रदूषित होण्याच्या मार्गावर आहेत. चिंचोळी तलावातील पाणी गढूळ पाण्यामुळे जलचर मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष दिलेले नाही. यासंदर्भात कायदे अभ्यासक मल्हार देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत तक्रार केली आहे.
------------------------------------
दहा हजार मूर्तींचे विसर्जन
महापालिकेने शहरात १४३ कृत्रिम तलाव तयार केले होते. २२ ठिकाणी नैसर्गिक तलावांमध्ये दहा हजार ६८७ गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या आहेत. महापालिका हद्दीतील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ४,३६१ घरगुती तसेच ७३४ सार्वजनिक मंडळांच्या ५,०९५ श्रीमूर्तींचे विसर्जन झाले. तसेच १४३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ५,५६८ घरगुती तसेच १५ सार्वजनिक मंडळांच्या ५,५८३ श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे ९,९२९ घरगुती व ७४९ सार्वजनिक मंडळांच्या एकूण १०,६७८ गणेशमूर्तीचे विसर्जन पार पडले. यामध्ये शाडूच्या १,९६६ मूर्तींचे विसर्जन झाले.
------------------------------------------
महापालिका हद्दीतील तलाव स्वच्छतेचा महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे. तर त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत दोन्ही संस्थांनी केलेल्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
- मल्हार देशमुख, वकील
------------------------------------------
वडाळे तलावाच्या जलस्रोतावर कब्जा
पनवेलकरांकडून ‘वारसा संरक्षण’ दर्जाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ ः पनवेल शहराचा अविभाज्य भाग असणारा वडाळे तलाव पर्यावरणीय संकटाच्या उंबरठ्यावर आहे. ‘जायंट साल्विनिया’ या आक्रमक जलचर फर्नने जलस्रोतावर कब्जा केला आहे. त्यामुळे या तलावाला ‘वारसा संरक्षण’ दर्जा देण्याची मागणी होत आहे.
वडाळे तलावाच्या पृष्ठभागावर तरंगत्या चटया पसरल्या आहेत. या जाड थरामुळे सूर्यप्रकाश, ऑक्सिजन पाण्याखाली पोहोचत नाही. परिणामी, जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एकेकाळी स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक जलीय वनस्पतींसाठी आश्रयस्थान असलेला तलाव आता मृतप्राय होत चालला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहन नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी केले आहे. पनवेलचे पक्षी निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार तलावात पक्ष्यांच्या विविधतेत अभूतपूर्व घट झाली आहे. पूर्वी डझनभर प्रजाती दिसायच्या, आता फक्त ११ प्रजाती आहेत. अशातच तलावातील जलसाठे कार्बन साठवणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र आक्रमक फर्नमुळे पाण्याची गुणवत्ता खालावते. याचा थेट परिणाम हवामान संतुलनावर होतो. तर तणनिर्मूलनासाठी वापरलेल्या यंत्रांमुळे स्थानिक वनस्पतीही नष्ट झाल्या. कमळ ही वनस्पती पाण्याची स्वच्छता आणि पक्ष्यांचे आश्रयस्थान दोन्ही राखत होती. तिचा नाश झाल्याने पूर्वी ८० हून अधिक पक्षीप्रजाती असलेल्या तलावात केवळ १० ते १५ प्रजाती शिल्लक असल्याचे निसर्गप्रेमी ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.