मोखाडा, ता. २६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून पुन्हा परतीच्या पावसाने झोडपले आहे. यापूर्वी पावसाने खरिपाचे पीक वाया गेले आहे. आता परतीच्या पावसाने शेतात कापून ठेवलेले पीक शेतातच तरंगू लागले आहे. तसेच खळ्यावर साठवलेले पीक ओले झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर एकाच खरीप हंगामात दुबार अस्मानी संकट कोसळले आहे.
पालघर जिल्ह्यात खरिपाचे एक लाख सात हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये ७६ हजार हेक्टर हे सर्वाधिक क्षेत्र भातपिकाचे आहे. या मुख्य पिकावरच शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाची वर्षभर गुजराण करावी लागते. यावर्षी सततच्या पावसाने खरिपाचे उभे पीक आडवे झाले आहे. जिल्ह्यात यावर्षी सरकारी पंचनाम्यानुसार १२ हजार ४८८९ क्षेत्राचे नुकसान झाले. यामध्ये ४६ हजार ५६३ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यासाठी भरपाई म्हणून सरकारने १२ कोटी ४० लाखांना मंजुरी दिली आहे, मात्र आता परतीच्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घातला आहे.
शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले पीक, शेतात पाणी साचल्याने शेतातच तरंगू लागले आहे. बचावलेले पीक घरात येईल, अशी अपेक्षा होती, मात्र परतीच्या पावसाने त्यावर घाला घातला आहे. त्यामुळे हेही पीक हातून जाणार असल्याने बळीराजाच्या हाती यंदा पिकाऐवजी पेंढाच येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पूर्वी उभे पीक शेतातच आडवे झाले. त्याचे पंचनामे प्रशासनाने योग्य पद्धतीने केले नाहीत. अनेक बाधित शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले. आता पुन्हा पावसाने शेतात कापून ठेवलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष पंचनामे करून सरकारने नुकसानभरपाई द्यावी.
- दिगंबर पाटील, शेतकरी, आडोशी, मोखाडा
-----
‘आता तरी थांब रे बाबा...!’
अवकाळी पावसाला शेतकऱ्याची हताश विनवणी
कासा (बातमीदार) : ‘देवा, आता तरी थांब रे बाबा...!’ ही वेदनादायी हाक सध्या डहाणू तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला पाऊस अजूनही ओसरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे सोने ठरलेले भातपीक आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
सुमारे ९० दिवसात तयार होणारे भातपीक अवकाळी पावसामुळे १२० दिवस उलटूनही शेतात अडकले. कधी सकाळी कापणी सुरू करायची, तर दुपारी मुसळधार पावसाने सगळे पाणी पाडायचे, असे दृश्य मागील चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. शेतकरी थकून भागून शेतातच दिवाळी साजरी करताहेत, पण हाती काही लागत नाही.
अनेक ठिकाणी भाताचे दाण्या-दाण्याने नुकसान झाले असून, धान्य ओले होऊन कुजत आहे. त्यामुळे यावर्षी भातपीक सोडाच, तर पावलीदेखील हाती येणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात सण-उत्सव, लग्नकार्य आदी भाकरी-पावलीच्या आधारावर चालते, पण गेल्या दोन वर्षांपासून सततच्या हवामान बदलामुळे शेतीचे भविष्य धूसर झाले आहे.
स्थलांतराची वेळ
अवकाळी पावसाने संपूर्ण डहाणू तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. सरकारने तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा शेतकरी कोलमडून पडेल. पावसाळाभर शेतात श्रम करून थोडेफार पीक मिळवणारे शेतकरी आता उपजीविकेसाठी स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहेत, असे वेती गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोईर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.