घोषबाबूंच्या पानाचे सिनेकलाकारही चाहते!
४० वर्षांपासून वांद्रेत ग्राहकाला भरवला जातो पान
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः जेवणानंतर विड्याचे पान-सुपारी (तांबूल) खाण्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये वर्षानुवर्षे भाग राहिली आहे. काळाच्या ओघात खाद्यसंस्कृतीतील अनेक पद्धती मागे पडल्या. तरी जेवणानंतर पान खाण्याची पद्धत अद्यापही टिकून आहे. पौराणिक मान्यतेनुसार, नैवेद्याला दाखवण्यात येणाऱ्या ५६ भोगांमध्येही तांबुलचाही समावेश आहे. संपू्र्ण भारतात पान ही एक ऐतिहासिक परंपरा म्हणून आजही जपली जाते. त्याला मुंबापुरीही अपवाद नाही. वांद्रे पश्चिम येथील आमियो घोष यांच्या पानाचे सिनेकलाकारही चाहते आहेत. वांद्र्यातील लिंक रोडवरील शॉपर्स स्टॉपसमोर, रस्त्याच्या कडेला असलेली ही पानाची गादी पानप्रेमींची अगत्याची झाली आहे.
आमियो घोष यांच्या सर्वच पानांना मागणी असते, त्यात कलकत्ता साधा, कलकत्ता नवरत्न (खिमाम), मीठा पान, सॅण्डविच पान प्रसिद्ध आहेत. सर्व पानं ६० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्रत्येक पानात तीन ते चार प्रकार आहेत. घोषबाबूंकडील हे पान मीडियम, लार्ज, फॅमिली पॅक अशा तीन प्रकारात मिळते. घोष यांच्याकडील ड्रायफ्रूट पान ही त्यांची स्पेशालिटी आहे. इतर पानांप्रमाणे ड्रायफ्रूट पानात ते गुलकंद, खोबरे, टुटीफ्रुटी तर घालतातच, त्यासोबत तीन प्रकारचे खजूर, सात वेगवेगळ्या प्रकारची बडीशेप, बदाम, काजू, किसमिस, चेरी यांचा वापर केला जातो. काळाप्रमाणे वडिलोपार्जित व्यवसायात मुलगा सूरजही हातभार लावत असून, त्यानेही काही खास पानांचा समावेश केला आहे. त्यात फायर पान, आइस पान त्यासोबतच चॉकलेट पानाचाही समावेश करण्यात आला आहे. चॉकलेट पानामध्ये चॉकलेट सिरप आणि आतून बाहेरून चॉकलेट चिप्स अगदी ओतप्रोत भरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या आगळ्यावेगळ्या पानांमुळे घोषबाबूंचं पान परदेशातही प्रसिद्ध आहे. तसेच हे पान सात ते १० दिवस टिकू शकत असल्यामुळे ते सहजच नेता येऊ शकत असल्याचेही सूरज सांगतो.
आपली पानं बनविण्याची पद्धत आणि त्यात वापरला जाणारा मसाला हा दुसरीकडे कुठेही मिळणार नाही, असे आमियो घोष सांगतात. त्याची प्रचीती दिवसभर दुकानावर येणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीतून दिसून येते. सकाळी ११ नंतर सुरू होणारी घोष यांची पानाची गादी रात्री १.३० वाजेपर्यंत सुरू असते आणि रात्री पान खाण्यासाठी लोकांची रांग लागते. रिक्षाचालकांपासून ते मर्सिडिजमधून लोक घोषबाबूंकडचे पान खायला गर्दी करतात. येणारा ग्राहक हा देवासमान असतो. त्याला आपल्या हाताने पान भरविले असता, त्याच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते, म्हणून घोष येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला पान भरवितात. पान भरविण्याची त्यांची ही आगळीवेगळी शक्कल मागील ४० वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.
सिनेतारकांची भेट
घोष यांच्या पानांचे सिनेकलाकारही चाहते आहेत. त्यामध्ये उल्लेख करावा, असे अरबाज खान, गायक तोशी, अध्यय सुमन, संजीव कपूर इत्यादींनी पानांची चव चाखली आहे.
मी पानाचा चाहता आहे. कामानिमित्त मी पुण्याला असतो. जेव्हा कधी मुंबईला येतो, तेव्हा मी घोष यांच्याकडे आवर्जून भेट देतो. त्यांचे पान खरच खूप खास आहे.
- कुणाल तुपे, ग्राहक
घोष यांच्याकडील साधा आणि मिठा पान माझे आवडते आहे. मी अनेक ठिकाणी पान खाल्ले आहे, पण येथील चव दुसरीकडे कुठेच नाही. हीच त्यांच्या पानाची खासियत आहे.
- अमित मकवाना, ग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.