खोपोलीत आरोग्यसेवा रामभरोसे
धूरफवारणीसह डास निर्मूलन यंत्रणा संपूर्णपणे ठप्प
खोपोली, ता. २७ (बातमीदार) : पावसाळ्यानंतर अद्यापही खोपोली शहरात एकदाही धूरफवारणी न झाल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे व सद्यस्थितीत वाढलेल्या तापमानामुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास झाली आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून शहरात मलेरिया, डेंगी यांसारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत, मात्र परिस्थिती गंभीर असताना आरोग्य विभागाची धूरफवारणी व डास निर्मूलन यंत्रणा संपूर्णपणे ठप्प पडल्याचे चित्र आहे.
नगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी लाखो रुपयांचा निधी खर्च करून आधुनिक धूरफवारणी यंत्रणा उपलब्ध करून घेतली होती. ही यंत्रणा नागरिकांना आरोग्यसुरक्षा देण्यासाठी महत्त्वाची ठरणार होती, मात्र देखभाल-अभाव आणि उदासीनतेमुळे हीच यंत्रणा आता मोडीत निघाल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. धूरफवारणीसाठी लागणाऱ्या मशिन्स, वाहनांचे तांत्रिक बिघाड, तसेच आवश्यक साहित्याचा तुटवडा यामुळे संपूर्ण मोहीम ठप्प असल्याचे समोर आले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात डासांचे प्रमाण सर्वाधिक वाढल्याने सायंकाळनंतर बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. परिणामी नागरिकांना स्वतःच्या खिशातून कीटकनाशके, स्प्रे, कॉइल्स, मशीन यावर दर महिन्याला पाचशे ते सहाशे रुपये खर्च करावे लागत आहेत. सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी असलेल्या नगरपालिकेमुळेच अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर पडत असल्याची टीका होत आहे. माजी नगरसेवक, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही. करवसुलीत अत्यंत आक्रमक भूमिका घेणाऱ्या प्रशासनाला मात्र शहरातील मूलभूत आरोग्यसेवा देण्याबाबत कोठेही तत्परता दिसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
.......................
लहान मुले, ज्येष्ठांना सर्वाधिक त्रास
विशेषतः मागील काही आठवड्यांपासून डासांमुळे लहान मुले, वृद्ध व रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या नागरिकांची स्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. शहरातील काही कुटुंबांमध्ये मलेरियासह इतर तापजन्य आजारांनी बाधितांची संख्या वाढत असल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे. तरीही संबंधित अधिकारी परिस्थितीवर मौन बाळगत असून, कोणीही अधिकृतपणे प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. डास निर्मूलन, धूरफवारणी मोहिमेसाठी आवश्यक यंत्रणा तातडीने दुरुस्त करून शहरात नियोजनबद्ध मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.