भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : व्हॉट्सॲप संदेशाद्वारे विद्यार्थ्याचे अपहरण करण्याची धमकी देऊन चार लाखांची खंडणी मागणाऱ्यास काशी मिरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी हा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या बसचा चालकच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
काशीगावमधील एका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आईला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून वारंवार व्हॉट्सॲप संदेश करण्यात येत होते. त्यात त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात येईल, अशी धमकी देऊन चार लाखांची मागणी करण्यात येत होती. महिलेने यासंदर्भात काशी मिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी संशयिताच्या मोबाईल फोनची तांत्रिक माहिती मिळवून मोबाईलधारकाची चौकशी करण्यात आली, मात्र त्यातून फारसे काही हाती लागले नाही. दरम्यान, त्याने व्हॉटसॲपद्वारे पाठवलेले विद्यार्थ्याचे छायाचित्र, त्याच्या आईने मुलाला शाळेत सोडणाऱ्या बसचालकाला दिले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी बसचालक सदानंद बाबूराव पत्री याची धरपकड केली. त्याच्या चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याचे समोर आले.
ग्राहकाची फसवणूक
संशयिताने विद्यार्थ्याचे छायाचित्र त्याच्या आईकडून मिळवले होते. त्याचे मोबाईल व सिम कार्ड विक्रीचेही दुकान आहे. त्याने दुकानात आलेल्या एका ग्राहकाच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याचे सिमकार्ड बंद झाल्याचे सांगून त्याचे सिम कार्ड स्वतःजवळ ठेवले व त्याला बंद झालेले सिम कार्ड दिले. ग्राहकाच्या सिम कार्ड क्रमांकावरून त्याने विद्यार्थ्याच्या आईला अपहरणाच्या धमकीचे संदेश पाठवले होते.
अन्य पालकांनाही धमकी
आपल्या बसमधून नेत असलेल्या आणखी तीन ते चार विद्यार्थ्यांच्या पालकांना धमकीचे व्हॉट्सॲप संदेश पाठवून खंडणी मागण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला रविवारी (ता. २६) अटक केली, अशी माहिती उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.