खोबऱ्याचा भाव बाजारात उतरणीला
मागणी नसल्याने प्रतिकिलो ३० रुपयांनी घसरले
वाशी, ता. २७ (बातमीदार)ः उत्सवकाळात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले खोबऱ्याचे भाव आता काहीसे कमी झाले आहेत. दिवाळीनंतर मागणी घटल्याने एपीएमसी घाऊक बाजारात प्रतिकिलो सुमारे ३० रुपयांनी भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवापाठोपाठ दिवाळीच्या फराळासाठी खोबऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यंदा अतिवृष्टीमुळे नारळाची आवक कमी झाली असल्याने स्थानिक बाजारपेठेत भाव उंचावले होते. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून खोबऱ्याचे भाव गगनाला भिडले होते. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले होते. विशेष म्हणजे, ऐन दिवाळीत खोबऱ्याचे भाव अचानक वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह मध्यमवर्गीयांच्या खिशावरही भार पडला होता, मात्र दिवाळी संपल्यानंतर लगेचच खोबऱ्याची मागणी कमी झाली होती. त्याचा थेट परिणाम भावांवर झाल्याने महिलांमध्ये समाधान आहे. आगामी काळात मागणीनुसार भावात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------------------------
डिसेंबरमध्ये भाववाढ
घाऊक विक्रेत्यांकडे खोबरे ४०० रुपयांवरून सुमारे ३७० रुपयांवर गेले आहे, तर किरकोळ बाजारात भाव ४८० रुपयांवरून ४४० ते ४५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सध्या तमिळनाडू येथून खोबऱ्याची आवक होत आहे. पावसामुळे खोबरे लवकर खराब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये डिंक लाडूसाठी खोबऱ्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
----------------------------------
नारळाचे भाव उतरणीला
यंदा बाजारात खोबऱ्याबरोबरच नारळाचे भावही आता काहीसे उतरले आहेत. उत्सवकाळात किरकोळ बाजारात नारळाचे भाव प्रतिनारळ ४० ते ४५ रुपये इतके झाल्याचे चित्र होते, मात्र घाऊक बाजारात नारळाच्या भावातही आता घट नोंदवली गेली असून, यापूर्वी प्रतिशेकडा तीन हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचलेले नारळाचे भाव आता दोन हजार ९०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. येत्या काळात खोबऱ्याचे आणखी किती वाढतात की ‘जैसे थे’ राहतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
-----------------------------
दिवाळीनंतर मागणी नैसर्गिकरीत्या घटते. त्यामुळे खोबऱ्याचे भाव काही प्रमाणात खाली आले आहेत, मात्र हवामानातील अनिश्चितता आणि डिसेंबरमध्ये मागणी वाढल्याने पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- दीपक छेडा, घाऊक व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.