नवी मुंबईत फेरीवाल्यांना ‘अभय’?
रस्ते, पदपथांवर अतिक्रमण; पादचारी त्रस्त
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची ओळख असली तरी अलीकडे शहरातील रस्ते, पदपथांवर वाढत चाललेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक व पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हे फेरीवाले मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, चेंबूर परिसरातून नवी मुंबईत व्यवसायासाठी येतात. त्यामुळे शहराच्या अस्वच्छतेसह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सायबर सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईचा विकास मागील काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे. मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आल्याने कर्मचारी वाढले. त्यामुळे गृहसंकुले आली. त्यामुळे लोकसंख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे नवी मुंबईत विविध ठिकाणी आठवडा बाजारांबरोबर पदपथावर अनधिकृत विक्रेत्यांचा भरणा वाढला. नवी मुंबईतील रेल्वेस्थानक, मोठे चौक, मॉल परिसर, बसस्थानक आणि प्रमुख व्यावसायिक रस्त्यांवर फेरीवाल्यांची मोठी गर्दी दिसून येते. पदपथांवर पूर्ण अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाऊन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. अधिकृत दुकानदारांचा व्यापारही घटत असल्याने बाजारपेठेतील तणाव वाढत आहे. नवी मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी दैनंदिन बाजार संकुल उभारले असतानाही त्याचे वाटप न झाल्याने ती इमारती रिकाम्या पडल्या आहेत. त्याचा लाभ न घेता रस्त्यावरच फेरीवाल्यांना आश्रय मिळत असल्याने शहराचा बकालपणा वाढत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी सांगितले.
.................
अनधिकृत आठवडा बाजारात वाढ
नवी मुंबईत आठवडा बाजारातही सतत वाढ होत आहे. रविवारी नेरूळ-शिरवणे, शनिवारी बेलापूर गाव, बुधवारी करावे व घणसोली, मंगळवारी दारावे येथे होणाऱ्या बाजारपेठेत प्रचंड गर्दी होते. येथे पाकीटमार व दरोडेखोरही सक्रिय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एका फेरीवाल्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पैसे दिले तरच बसू देतात, नाहीतर पालिकेची गाडी येऊन सामान उचलून नेते.
................
कोट
वाहतूक कोंडीसह पदपथावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर प्राधान्याने कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेस्थानक फेरीवालामुक्त ठेवण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. कैलास गायकवाड, अतिक्रमण उपयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.