अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेत गटबाजी!
किणीकर विरुद्ध वाळेकर प्रतिष्ठेची लढाई; तीन महिला नावांभोवतीच चर्चेचा केंद्रबिंदू
अंबरनाथ, ता. २८ (वार्ताहर) ः अंबरनाथ नगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटामध्ये जोरदार गटबाजी सुरू झाली आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या या पदासाठी आमदार बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या गटांमधील मतभेद पुन्हा उघड झाले असून, या दोन्ही गटांतील प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. सध्या शहरात शिल्पा किणीकर, मनीषा वाळेकर आणि पन्ना वारिंगे या तीन महिला नावांभोवतीच चर्चेचे वर्तुळ फिरताना दिसत आहे.
किणीकर यांच्या पत्नी डॉ. शिल्पा किणीकर यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे, माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या अनुभवामुळे वाळेकर गट त्यांच्या उमेदवारीवर ठाम आहे. या संघर्षाच्या दरम्यान माजी नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांच्या पत्नी पन्ना वारिंगे यांचे नाव तडजोड उमेदवार म्हणून पुढे आले आहे. दोन्ही गटांशी चांगले संबंध राखल्याने त्यांची दावेदारी पक्षश्रेष्ठींकडून विचारात घेतली जाऊ शकते, असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
महिला आरक्षणामुळे महिला उमेदवार निश्चित असल्याने आणखी काही नावे चर्चेत आहेत. त्यात माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या पत्नी अनिता चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या पत्नी सुवर्णा साळुंखे आणि अपर्णा भोईर आणि वीणा उगले यांचा समावेश आहे.
शिंदे सेनेत तणाव
किणीकर आणि वाळेकर गटांतील स्पर्धा इतकी वाढली आहे, की दोघांच्या पोस्टरवर एकमेकांची नावे नसणे, कार्यक्रमांवर बहिष्कार आणि कार्यकर्त्यांतील वैमनस्य यामुळे शिवसेनेतील एकजूट धोक्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडीने केवळ महिला उमेदवारांतील स्पर्धा न राहता, किणीकर विरुद्ध वाळेकर अशा दोन गटांतील प्रतिष्ठेची थेट लढाई आकार घेत आहे.
अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडे
दोन्ही गट आपापल्या उमेदवारावर ठाम असले तरी, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून होणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते, जर पक्षाने शिल्पा किणीकर आणि मनीषा वाळेकर या दोघींनाही बाजूला ठेवून नवीन चेहरा पुढे आणला, तर अंबरनाथच्या राजकारणातील समीकरणच बदलू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.