ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना नाट्यसृष्टीतील कलाकार मंडळींनी वाहिलेली श्रद्धांजली...
--
नीलम शिर्के-सामंत
गंगाराम काका आमच्यासाठी अगदी घरच्यासारखेच होते. आम्ही काही केले, की त्यांना ते आवडायचे आणि ते तसे हक्काने सांगायचे. कुठे थोडे कमी पडलो तरी ते प्रेमाने सुचवायचे. त्यांच्या बोलण्यातला आपलेपणा, त्या हसऱ्या चेहऱ्यातला उबदारपणा आजही डोळ्यांसमोर उभा आहे. आजारी असतानाही ते प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहित करायचे. नव्या कलाकारांना आणि लेखकांना मार्गदर्शन करणे, प्रोत्साहन देणे हा त्यांचा स्वभाव होता. काकांनी संपूर्ण महाराष्ट्राला मालवणी भाषेची ओळख करून दिली, हे त्यांच्या आयुष्याचे खरे यश आहे. काका हसत-हसत कोकणी माणसाची खासियत सांगायचे, त्याची खोडही काढायचे आणि तरीही प्रत्येक शब्दातून प्रेम ओसंडून वाहायचे. मी जेव्हा एकांकिका करत होते तेव्हाच आमची पहिली भेट झाली. आम्हाला त्यांच्यासारख्या दिग्गज लेखकाचे कौतुक मिळणे, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. ते मेकअप रूममध्ये यायचे, आमच्या कामाचे कौतुक करायचे आणि म्हणायचे, ‘हे छान झालंय; पण इथे थोडं सुधारता येईल.’ त्या त्यांच्या एका वाक्यात इतके प्रोत्साहन असायचे, की पुढचे काम अधिक आत्मविश्वासाने करावेसे वाटायचे. त्यांच्या जाण्याने कोकणात एक पोकळी निर्माण झाली आहे. अख्ख्या कोकणाला आणि मराठी रंगभूमीला त्यांची उणीव सदैव भासेल.
--
प्रभाकर मोरे
गंगाराम गवाणकर आमचे फार मोठे आदर्श होते. माझ्या रंगभूमीवरील प्रवासाची सुरुवात ‘वस्त्रहरण’ नाटकातून झाली. त्या नाटकाद्वारे मला रंगभूमीवर पहिली संधी मिळाली. आमचे दोघांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते नेहमी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायचे. प्रोत्साहन देणारे आणि आपुलकीने सगळ्यांची विचारपूस करणारे असे ते होते. माझ्यासाठी ते गुरूसमान होते. ‘वस्त्रहरण’सारखे नाटक खूप काही शिकवून जाते. आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांनी ते नक्की पाहावे, असे मला मनापासून वाटते. त्यांच्या जाण्याची बातमी ऐकून मन अतिशय व्यथित झाले आहे.
--
प्रियदर्शन जाधव
मराठी रंगभूमीवर ‘वस्त्रहरण’ एक गौरवशाली नाटक ठरले. गंगाराम गवाणकर यांच्यासारख्या अस्सल आणि विलक्षण शैलीत असे नाटक आधी कोणी लिहिले नव्हते आणि पुढेही कोणी लिहू शकणार नाही. ‘वस्त्रहरण’मध्ये काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट होती. एकदा ते आमचा प्रयोग पाहायला आले होते आणि त्यांनी आमचे भरभरून कौतुक केले होते. फक्त ‘वस्त्रहरण’ नव्हे; तर ‘वात्रट मेले’ नावाचे त्यांचे आणखी एक नाटकही प्रचंड गाजले. आज आपल्या सगळ्यांतून एक मोठा माणूस निघून गेला, ही अत्यंत दुःखद बाब आहे.
--
किशोरी अंबिये
माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दूरदर्शनवर १३ भागांच्या मालिका असायच्या. त्या काळात दामू केंकरे यांनी बसवलेले ‘कशी मी राहू तशीच’ या नाटकात मी छोटी सहाय्यक भूमिका करत होते. तेव्हा गंगाराम काका ते नाटक पाहायला आले होते. ते स्वतःहून माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘तू खूप छान काम करतेस.’ मी लागलीच त्यांच्या पाया पडले आणि नंतर सर्वांना सांगितले, की ते गंगाराम गवाणकर होते. दोन-तीन दिवसांनी निर्माते विनोद गणात्रा यांच्या कार्यालयातून मला फोन आला, की गंगाराम गवाणकर यांनी तुमचे नाव सुचवले आहे, ‘गिनी पिग’ नावाच्या नव्या मालिकेच्या मुख्य भूमिकेसाठी... तेव्हा मी फक्त छोट्या-मोठ्या भूमिका करत होते. चित्रपटही करत नव्हते. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाने माझे नाटक पाहून स्वतःहून माझ्याकडे येणे आणि माझ्या कामाचे कौतुक करणे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. काकांची ही आठवण माझ्या मनात कायम राहील. ते ‘वस्त्रहरण’च्या प्रयोगाला अजूनही यायचे. त्यांना माझे काम आवडायचे. मी त्यांची आवडती आणि लाडकी कलाकार होते अन् माझेही ते अतिशय लाडके लेखक होते. माझ्यासाठी ते एक वडीलधारी व्यक्तिमत्त्व होते.
--
अंशुमन विचारे
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की मला गंगाराम गवाणकर यांच्यासारख्या दिग्गज नाटककाराच्या नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. त्यातील एक म्हणजे माइलस्टोन ठरलेले ‘वस्त्रहरण.’ मालवणी भाषेवरचे त्यांचे प्रेम आणि ती भाषा जपण्याचे काम त्यांनी मनापासून केले. असे एक नाटककार, ज्याने इतिहास रचला ते आता आपल्यात नाहीत, याचे अतीव दुःख आहे. मला सर्वात कमाल वाटायची ते म्हणजे त्या काळी बाबूजींनी (मच्छिंद्र कांबळी) केलेले ‘वस्त्रहरण’ आणि आता आमच्यासारख्या नवीन पिढीने केलेले ते नाटक त्यांनी तितक्याच प्रेमाने अन् ताकदीने स्वीकारले. आम्ही त्यात खूप बदल करायचो; पण तरीही त्यांना ते आवडायचे आणि त्यावर ते हसायचेही. कारण एखादा नाटककार आपल्या नाटकात बदल केले तर नाराज होतो; पण ते कधीच तसे नव्हते. त्यांचा स्वभाव खूप दिलखुलास होता आणि ती गोष्ट मला खूप आवडायची. एक व्यक्ती म्हणून ते खूप मोठे होते आणि नाटककार म्हणून तर अजूनही महान. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे खरेच मोठे भाग्य आहे, असे मला वाटते.
--
प्रणव रावराणे
गंगाराम गवाणकर यांच्या जाण्याने मालवणी नाटकांचा एक मोठा आधारस्तंभ गेला आहे. त्यांच्या इतकी सुपरहिट मालवणी नाटके लिहिणारा दुसरा कोणी माणूस नव्हता. त्यांचे जाणे हे मालवणी भाषेचे नुकसान आहे. त्यांची एक आठवण माझ्या नेहमी लक्षात राहील. ‘वस्त्रहरण’ नाटक करताना ते नेहमी विंगेत येऊन बसायचे. पहिल्यांदाच नाटक बघत असल्यासारखे ते प्रत्येक प्रयोगाचा आनंद घ्यायचे. आम्ही घेतलेल्या ॲडिशन्स त्यांना नेहमी आवडायच्या. एक किस्सा आठवतो... हल्लीच आम्ही ‘वस्त्रहरण’ नाटकात खूप ॲडिशन्स घेत होतो. तेव्हा प्रसाद दादांनी (प्रसाद कांबळी) गवाणकर काकांना बोलावून सांगितले, ‘या पोरांना सांगा बरं, हे खूप ॲडिशन्स घेतात.’ पण काका इतके गोड होते, की ते नाटकाला येऊन बसले आणि आम्ही घेतलेल्या ॲडिशन्सवर स्वतःच खळखळून हसले. त्यांनी लिहिलेले ‘वस्त्रहरण’ खूपच अजरामर होते; पण तरीसुद्धा आम्ही जे काही करायचो त्यावर ते आनंदाने हसायचे. त्यांनी आम्हाला कधीच म्हटले नाही, की ‘मी लिहिलेलं नाटकच तुम्ही का नाही करत?’ प्रसाद दादांनी त्यांना आम्हाला ओरडायला बोलावलं होते; पण उलट ते स्वतःच खळखळून हसले... मी २०१२ पासून ‘वस्त्रहरण’ नाटक करतोय. त्यात मी प्रॉम्प्टरची भूमिका साकारतो. अजूनही मला आठवते, त्यांनी शेवटचे वाक्य म्हणून मला मिठी मारली होती. ते म्हणाले, ‘तू प्रॉम्प्टर जिवंत केलास.’ मला गवाणकर काकांशिवाय ‘वस्त्रहरण’ची कल्पनाच करता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.