सकाळ इम्पॅक्ट
----
प्राध्यापक भरतीचा घोळ
----
प्राध्यापक भरतीच्या गोंधळाचे कुलगुरूंच्या बैठकीत पडसाद
जुन्याच निकषांवर भरती करण्याची मागणी
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्यातील कुलगुरूंची बैठक झाली. त्यात कुलगुरूंनी अडचणींचा पाढा वाचत सरकारने मागील वर्षांच्या आदेश आणि ठरलेल्या निकषांनुसारच ही भरती करण्याची मागणी लावून धरली, तर ६ ऑक्टोबरच्या आदेशाने झालेल्या अडचणींचे पडसादही या बैठकीत उमटले.
प्राध्यापक भरतीसंदर्भातील विविध अडचणी, त्यातील त्रुटी आणि निकषांवर प्रकाश टाकण्यासाठी ‘सकाळ’मध्ये मागील पाच दिवसांपासून ‘प्राध्यापक भरतीचा घोळ’ या सदराखाली वृत्तमालिका सुरू आहे. त्यातून समोर आलेल्या विषयांवरही या बैठकीत कुलगुरूंनी चर्चा केली. या वेळी मागील वर्षी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींचे काय होणार, यासंदर्भात मंगळवारी (ता. २८) प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर सर्वाधिक चर्चा झाली. मागील वर्षी जाहिरात प्रसिद्ध केल्या असतील तर त्यासंदर्भात शुद्धीपत्रक जाहीर करावे. नवी जाहिरात प्रसिद्ध करायची असेल, तर तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्याचेही सांगण्यात आले. तसेच भरती प्रक्रियेला अधिक गती येण्यासाठी धोरणात्मक बाबींवर सविस्तर चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
----
मागील वर्षाचेच निकष आवश्यक
प्राध्यापक भरतीच्या जुन्या निकषांनुसार भरती करण्याऐवजी नव्या निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची माहिती घेतली जाईल. त्यात जे उमेदवार या निकषांत बसतील, त्याबाबतची माहिती घेऊन सुधारणा करण्याची सूचना सचिवांनी केली; मात्र त्यावर कुलगुरूंनी येणाऱ्या अडचणी, न्यायालयीन प्रकरणाची शक्यता आदींवर माहिती देत मागील वर्षाच्याच निकषांचा आधार घेत ही भरती होणे आवश्यक आहे. बदल करायचे असतील तर पुढील प्रक्रियेवेळी करावेत, असेही मत काही कुलगुरूंनी व्यक्त केली.
----
पूर्ण पडताळणी आणि स्पष्टता हवी
दरम्यान, नवीन गुणांकन पद्धतीमुळे प्राध्यापक भरतीत उमेदवारांवर अन्याय होणार नाही. याबाबत पडताळणी करून प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी. एनईपीच्या अंमलबजावणीसोबत राज्यातील विद्यापीठांनी गुणवत्तेला अधिक प्राधान्य द्यावे, रँकिंग वाढवण्यासाठी सर्व विद्यापीठांनी कालबद्ध नियोजन करावे, अशाही सूचना मंत्री पाटील यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
–
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, प्राध्यापक भरतीच्या प्रकरणात सरकारची कोंडी होऊ शकते. यामुळे ही भरती प्रक्रिया अधिक वेगाने आणि निर्विघ्नपणे पार व्हावी, यासाठी सरकारकडून हवे ते प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घालत ही प्रक्रिया करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असल्याचे मंत्रालयातील अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे भरती प्रक्रियेला गती येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.