वालधुनी नदीची प्रदूषणातून मुक्ती
चार मलशुद्धीकरण केंद्रे कार्यान्वित; ४१६ कोटींचा निधी
उल्हासनगर, ता. १ (बातमीदार) : जवळपास ३५ ते ४० वर्षांपूर्वी नितळ पाण्याने वाहणाऱ्या उल्हासनगरमधील वालधुनी नदीला जीन्स आणि केमिकल कारखान्यांमुळे प्रदूषणाचा शाप मिळाला होता. आता या शापातून नदीला बाहेर काढण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून, घाण पाणी शुद्ध करून नदीत सोडण्यासाठी चार मलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही केंद्रे कार्यान्वित झाली असून, आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी नुकताच या केंद्रांचा पाहणी करून आढावा घेतला.
अमृत योजनेतून निधी
अमृत योजनेअंतर्गत ४१६ कोटी रुपयांच्या निधीतून वालधुनी नदीवर एकूण चार मलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यात वडोळ गाव २०.७२ दशलक्ष लिटरची क्षमता, शांतीनगर ३१.२६ दशलक्ष लिटर क्षमता, खेमानी नाला १५ दशलक्ष लिटर क्षमता आणि खेडेगोळवली आठ दशलक्ष लिटर क्षमता या मलशुद्धीकरण केंद्रांचा समावेश आहे. तसेच शांतीनगर येथे आणखीन एक मलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत असून, त्याचे काम प्रगतिपथावर आहे.
नदीच्या पाण्याचा रंग बदलला
वालधुनी नदीचा उगम श्री मलंगगडाच्या पायथ्याशी होतो आणि ती अंबरनाथ, उल्हासनगर, शांतीनगरमार्गे कल्याणच्या खाडीपर्यंत प्रवास करते. ५० ते ४० वर्षांपूर्वी ही नदी नितळ पाण्याची होती आणि सहल तसेच मासेमारीसाठी ओळखली जात होती. कालांतराने जीन्स कारखाने आणि केमिकल कारखान्यांमध्ये वाढ झाल्याने नदीतील नितळ पाण्याचे रूपांतर दूषित पाण्यात झाले. त्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग हिरवा, पिवळा, गुलाबी आणि काळा असा बदलताना दिसतो.
भविष्यातील योजना
आता चार मलशुद्धीकरण केंद्रे कार्यान्वित झाल्याने नदीतील घाण पाण्याचे शुद्धीकरण करून ते नदीत सोडले जाईल. येत्या काही वर्षांत नदीचे रुपडे बदलण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. नदीवर विसर्जन घाट, छटपूजा आणि इतर धार्मिक कार्यांसाठी घाटांची बांधणीही केली जाणार आहे. या पाहणीदरम्यान उपायुक्त अनंत जवादवार, उपअभियंता परमेश्वर बुडगे आणि कन्सल्टंट जीवन बरबडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.