मुलांच्या पालकांचे जबाब नाेंदवणार
पैशांची मागणी केली असल्यास खंडणीची कलमे
मुंबई : प्रत्यक्षदर्शींसह १२ जणांच्या जबाबात राेहित आर्या याने पैशांची मागणी केल्याच्या दाव्याला आधार देणारी माहिती पुढे आली नसल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात ओलीस ठेवलेल्या मुलांच्या पालकांचे तपशीलवार जबाब नाेंदवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओलीसनाट्यादरम्यान पाेलिसांशी चर्चा सुरू असताना अपहरणकर्ता राेहित आर्या याला भावनिक साद घालण्यासाठी त्याचे मुलांच्या पालकांशी बाेलणे करून देण्यात आले. तेव्हा आणि स्वतंत्रपणे संपर्क करून त्याने पालकांकडे पैशांची मागणी केल्याचा दावा पालकांनी केला हाेता. पालकांच्या जबाबात त्याने पैशांची मागणी केल्याचे उघड झाल्यास त्याच्याविरोधातील गुन्ह्यात खंडणीचे कलम जोडले जाण्याची शक्यता आहे.
वाघमारे यांचा जबाब नोंदवला
आर्यावर गोळी झाडणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे यांचा तपशीलवार जबाब नोंदवण्यात आल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार या जबाबाद्वारे आर्यावर गोळी झाडण्याची, विशेषतः छातीवर गोळी मारण्याची निकड का भासली हे वाघमारे यांनी स्पष्ट केल्याचे समजते. दरम्यान, याबाबत तपासाशी संबंधित प्रत्येक अधिकाऱ्याने माहिती देणे टाळले.
त्या कलाकारांचीही चौकशी?
आर्याच्या आमंत्रणावरून २६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान ओलीसनाट्य घडलेल्या पवईच्या स्टुडिओत हजेरी लावणाऱ्या दोन ख्यातनाम मराठी कलाकारांचे आवश्यकतेनुसार जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
आर्यावर घाईने अंत्यसंस्कार
शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास जे. जे. रुग्णालयात शवचिकित्सा पार पडल्यानंतर नातेवाइकांनी आर्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पुण्यात नेला. मध्यरात्रीच पत्नी, मुलगा व निवडक नातेवाइकांच्या उपस्थितीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
----
मला आर्याने बंदूक दाखवली!
पवईच्या स्टुडिओबाहेर चहा विकणाऱ्या उमेश तिवारी यांनी ओलीसनाट्यादरम्यान रोहित आर्याने बंदूक दाखवून धमकावल्याचा दावा केला आहे. स्टुडिओत चहा-नाश्ता पुरवणाऱ्या तिवारी यांनी केलेल्या दाव्यानुसार लहान मुलांच्या ऑडिशन सुरू असल्याची माहिती मिळताच स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या मुलांना ऑडिशनसाठी आणले होते. ही सर्व मुले पहिल्या, दुसऱ्या फेरीत बाद झाली. घटना घडली त्या दिवशी स्टुडिओमधून आरडाओरडा ऐकला तेव्हा धावत तेथे पोहोचलाे. बाहेर पालकांच्या गर्दीत आर्याचा व्हिडिओ पाहून पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवले. अडकलेल्या मुलांची चिंता सतावू लागल्याने इमारतीच्या दुरुस्तीसाठी बांधलेल्या परांचीवर चढलो. काचेतून काही दिसते का ते पाहू लागलो. तेव्हा रोहितने मला पाहिले आणि माझ्या दिशेने बंदूक रोखून तिथून खाली उतरण्याचा इशारा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.