भिवंडी, ता. १२ (वार्ताहर) : गुजरातमधील खावडा ते पडघादरम्यान विद्युत ट्रान्समिशन प्रकल्प राबविला जात आहे. त्यासाठी पालघर व ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये टॉवर व वीजवाहिनी उभारली जात आहे. बाधित शेतकऱ्यांना सबळ करण्यासाठी आणि पारदर्शक संवादाला बळ देण्यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या संकल्पनेतून देशातील पहिली पायाभूत प्रकल्पांसाठी समर्पित तक्रार निवारण मदतवाहिनी खावडा ४ सी ट्रान्समिशन प्रकल्पातर्फे सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या मदतवाहिनीमुळे पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढविण्यासोबत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांच्याशी थेट संवाद अधिक मजबूत होणार आहे.
खावडा ४सी ट्रान्समिशन लिमिटेडने ही मदतवाहिनी विकसित केली असून, खासदार डॉ. सवरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आकारास आला आहे. यामुळे ग्रामस्थांना प्रकल्प कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही. ही मदतवाहिनी सोमवार ते शनिवार सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कार्यरत राहील. प्रशिक्षित मराठी भाषिक ऑपरेटर प्रत्येक फोन स्वीकारतील. शेतकऱ्याचे नाव, गाव, सर्व्हे क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप नोंदवून ४८ तासांच्या आत प्रतिसाद देतील, अशी माहिती प्रकल्प प्रशासनाने दिली.
पारदर्शकतेकडे एक पाऊल
आमच्या प्रकल्पातील सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जर कोणाला काही अडचण किंवा असमाधान वाटले, तर त्यांनी थेट या मदतवाहिनीवर संपर्क साधावा, असे रेसोनिया कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष निनाद पितळे यांनी सांगितले. प्रत्येक कॉलची नोंद ठेवून त्यावर सातत्याने लक्ष दिले जाईल, तसेच तक्रारींचा अभ्यास करून भविष्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक ठोस उपाययोजना राबवली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
खावडा प्रकल्प म्हणजे काय?
खावडा ४सी पॉवर ट्रान्समिशन प्रकल्प हा गुजरातमधील खावडा आणि महाराष्ट्रातील पडघा यांना जोडणारा उच्चदाब आंतरराज्यीय वीजप्रवाह मार्ग आहे. या प्रकल्पाद्वारे खावडा नूतन ऊर्जा उद्यानातून तब्बल सात गिगावॅट हरित ऊर्जा महाराष्ट्रात पोहोचवली जाणार आहे. राज्यातील वाढत्या औद्योगिक आणि शहरी विकासाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प वीजटंचाई कमी करण्यास आणि नूतन ऊर्जा उद्दिष्टांना गती देण्यास हातभार लावणार आहे. या माध्यमातून हरित ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा वाढण्यास मोठी चालना मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.