शिक्षण आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल
राऊत दाम्पत्याचा ठाण्यात सन्मान
घाटकोपर. ता. १२ (बातमीदार) : प्रारंभ कला अकॅडमीतर्फे आयोजित ‘महिला महोत्सव २०२५’ सोहळा ठाण्यातील आर मॉल घोडबंदर रोड येथे नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यामध्ये घाटकोपर आणि विक्रोळी येथील शैक्षणिक संस्थांच्या कार्याबद्दल डॉ. अनघा राऊत आणि डॉ. विनय राऊत या राऊत दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात आला.
विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटी आणि घाटकोपर येथील स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डी. पी. फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर, समाजसेविका रेणु गावसकर आणि प्रारंभ अकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यात राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य प. म. राऊत आणि माजी सीईओ कै. विद्या राऊत यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली. राऊत दाम्पत्य शिक्षण, समाजसेवा आणि संस्काराचे उत्तम उदाहरण असून, त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन बदलले आहे, असे मत डॉ. अरुंधती भालेराव यांनी व्यक्त केले.
या महोत्सवात वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. विजय आणि पल्लवी सुरासे, सांस्कृतिक संस्थांचे रवी आणि निशा नवले, तसेच संगीत क्षेत्रातील मेघना आणि प्रशांत काळुंद्रेकर या दांपत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला ‘श्वास’ चित्रपटाच्या ऑस्कर विजेत्या लेखिका माधुरी घारपुरे, डॉ. सचिन पैठणकर, प्रतिश आंबेकर, तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर सदानंद रावराणे (मिलिंद विद्यालय, पवई), राजेंद्र बोराडे (विद्या भवन, पुणे विद्यार्थी गृह, घाटकोपर), मारुती म्हात्रे (अमरकोर विद्यालय, भांडुप), अनिल जोशी (सरस्वती विद्यामंदिर, चेंबूर) यांच्यासह माधवी नांदोसकर, डॉ. मेघा शेट्टी, विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, शिक्षकवर्ग, कर्मचारी, आप्तेष्ट आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.