प्रदूषणाने आरोग्य दावणीला
पनवेलकरांना डोळ्यांची चुरचुर, श्वसनाचे त्रास
पनवेल, ता. १२ (बातमीदार)ः पनवेल परिसरातील कळंबोली, कामोठे, खारघर आणि नवीन पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून रासायनांचा उग्र वास येत आहे. यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना डोळ्यांना चुरचुर, घशात खवखव, श्वसनाच्या तक्रारी जाणवत आहेत.
पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या वातावरणात गारवा वाढला आहे. सकाळी धुके पसरत असल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे, पण पनवेल परिसरातील काही भागांमध्ये काही दिवसांपासून रासायनिक वायू हवेत सोडले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून हे वायू सोडले जात असल्याची शंका सामाजिक संस्थांनी व्यक्त केली आहे. या परिसरातील काही केमिकल आणि फार्मा कारखान्यांतून रात्री किंवा पहाटे रासायनिक वायू हवेत सोडले जात असल्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी खाडीमध्ये केमिकल सोडले जात असल्याने हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे.
--------------------------
सरकारी यंत्रणा निष्क्रिय
या समस्येवर अनेकदा नागरिक, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर विधानसभेत लक्ष वेधले होते. तळोजा एमआयडीसीमधील कारखान्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. तरीदेखील परिस्थिती जैसे थे असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
--------------------------
प्रदूषण नियंत्रण मंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक वेळा तपासणी केल्याचे सांगितले जाते, मात्र कारवाईची गती, परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह आहे. तपासणीनंतर काही दिवस वास कमी होतो, पण पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती पूर्ववत होते. तक्रार केल्यावर अधिकारी अहवाल बनवतात, पण काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
------------------------------------
कारवाई करा
पनवेल परिसरात हवेतून पसरणारे हे रासायनिक प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका ठरत आहे. अनेक तक्रारी, आंदोलने, लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतरही स्थिती तशीच आहे. या समस्येवर प्रशासनाने ठोस आणि जबाबदार कारवाई केली नाही, तर पनवेलकरांचा श्वास घेणे कठीण होईल, अशी भीती असल्याचे स्त्री शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विजया कदम यांनी व्यक्त केली आहे.
-----------------------------
जवाहर औद्योगिक वसाहत पनवेल शहर परिसरामध्ये आहे, परंतु या वसाहतीमधून कुठल्याही प्रकारचा उग्र दर्प येत नाही. त्यामुळे कळंबोली नावडे परिसरात येणारा उग्र वास हा बाजूच्या औद्योगिक वसाहतीमधून येत असावा.
- संजय भोसले, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, पनवेल
-----------------------------
तळोजा-कळंबोली नावडे परिसरातून येणाऱ्या उग्र दर्प संदर्भात पनवेल पालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला चौकशी करण्यास सांगितले आहे.
- स्वरूप खरगे, उपायुक्त पनवेल पालिका