नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १२ : शहरातील वाढत्या हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी तातडीचे आदेश जारी केले आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार शहरातील सर्व विभागांना प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बांधकामस्थळांवरील धूळ, कचऱ्याचे जाळणे, प्लॅस्टिकचा वापर, वायुप्रदूषण निर्माण करणारी कामे आणि रस्त्यावरील धूळ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले असून, या उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
शहरातील वायुप्रदूषणावर अंकुश आणण्यासाठी महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी प्रशासनाला कठोर उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील प्रत्येक विभागाला विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. नगररचना विभागाला सर्व बांधकामधारकांना हवेच्या प्रदूषण विषयक नियमांचे पालन करण्याच्या नोटिसा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी जाळी लावणे, रस्त्यावर पाण्याची फवारणी करणे, तसेच बांधकाम स्थळांवरील कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
उल्लंघन झाल्यास बांधकाम बंद
प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या क्षेत्रातील बांधकामस्थळांची नियमित पाहणी करून नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तपासणी करण्यास सांगितले आहे. उल्लंघन आढळल्यास बांधकाम तत्काळ बंद करण्याची सूचना केली आहेत. तसेच अमृत योजना, भुयारी गटार, पाणीपुरवठा योजना आदी सरकारी प्रकल्पांमुळे होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित पाण्याची फवारणी (मिस्ट स्प्रे मशीन) आणिधूळ साफ करण्याची मशीन (डस्ट स्वीपिंग मशीन)चा वापर करून रस्ते स्वच्छ ठेवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.
आरोग्य, जनसंपर्क विभागालाही जबाबदारी
सार्वजनिक आरोग्य विभागाला सिंगल-यूज प्लॅस्टिकवर बंदी, कचरा जाळणे थांबवणे आणि वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट अशा प्रकारे लावावी की त्यातून दुर्गंधी आणि धूर निर्माण होणार नाही, यावर भर देण्यात आला आहे. जनसंपर्क विभागाला प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची माहिती प्रसारमाध्यमांना नियमित देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नियमित हवेचा दर्जा तपासणार
पर्यावरण विभागाला हवेचा दर्जा नियमित तपासून प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, यामध्ये कोणताही विलंब अथवा हलगर्जीपणा चालणार नाही. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिले.
उल्हासनगरच्या नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण देणे ही सर्वोच्च जबाबदारी आहे. हवेचे प्रदूषण पर्यावरणाचे नव्हे तर आरोग्याचेही गंभीर आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करत शहरातील धूळ, धूर आणि कचऱ्यावर तातडीने नियंत्रण आणावे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. नागरिकांच्या सहभागातून ‘स्वच्छ हवा-स्वस्थ उल्हासनगर’ हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आता नागरिकांनीही जबाबदारीने सहकार्य करणे आवश्यक आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
महत्त्वाचे मुद्दे
१) सर्व बांधकामस्थळांना प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करण्याच्या नोटिसा.
२) नियमांचे उल्लंघन झाल्यास बांधकाम तत्काळ बंद करण्याचे अधिकार.
३) मिस्ट स्प्रे व डस्ट स्वीपिंग मशीनद्वारे नियमित धूळ नियंत्रण.
४) सिंगल यूज प्लॅस्टिक व कचरा जाळण्यावर बंदी.
५) एक्यूआय निरीक्षण आणि पर्यावरण सुधारासाठी तत्पर उपाययोजना.
६) जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांचा सहभाग.
उल्हासनगर : ‘प्रदूषणमुक्त उल्हासनगर’साठी आयुक्तांनी प्रत्येक विभागांना उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.