ठाण्यात लवकरच ‘एअर अॅम्बुलन्स’
देशभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात पहिलाच प्रयाेग; इमारतीवर हेलिपॅड तयार
हेमलता वाडकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : नव्याने बांधण्यात येणाऱ्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीवर हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्यासाठी ही तयारी सुरू केली आहे. राज्य सरकार किंवा उद्याेगांच्या सामाजिक दायित्वातून ही ॲम्बुलन्स उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू असून दुर्घटना किंवा गंभीर रुग्णांसाठी ही ॲम्बुलन्स वरदान ठरणार आहे. ही सेवा सुरू झाल्यास हा जिल्हा सामान्य रुग्णालयातील देशभरातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. तसेच एअर ॲम्ब्युलन्ससाठी प्रथमच इमारतीवर हेलिपॅड तयार करण्यात आला आहे, असा दावाही जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालयाच्या ताफ्यता एअर अॅम्ब्युलन्स आणण्याचा प्रयत्न असून लवकरच हे स्वप्न साकार होताना दिसेल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी दिली. ठाण्यात सुपर स्पेशलिटी ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात त्याचे उद्घाटन हाेण्याची तयारी सुरू झाली आहे. खासगी रुग्णालयाच्या दर्जाच्या अत्याधुनिक सुविधांबराेबरच भविष्याचा वेध घेऊन एअर अॅम्ब्युलन्सची सुविधाही देण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात नवीन रुग्णालय इमारतीच्या प्रशस्त गच्चीवर हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. या हेलिपॅडवर जिल्हा रुग्णालयाच्या मालकीची एअर अॅम्ब्युलन्स उतरण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असून वरिष्ठ पातळीवर ठोस निर्णय झाला नसल्याचे समजते. आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारच्या ताफ्यातील एअर अॅम्ब्युलन्सला ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचा मार्ग तूर्तास मोकळा असणार आहे.
-----
या सुविधेची गरज काय?
ठाणे शहरासह जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे, बुलेट ट्रेन, मेट्रो, समृद्धी मार्ग यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. त्यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून मुंबई, पुणे, नाशिक आणि गुजरातला जोडणाऱ्या ठाण्यात एअर अॅम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध झाल्यास महामार्ग किंवा इतर अपघातप्रसंगी जखमींना तत्काळ रुग्णालयात आणणे शक्य होणार आहे. या एअर अॅम्ब्युलन्समध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा असल्याने तासाभरात उपचार मिळून असंख्य जीव वाचवणे शक्य होणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी सांगितले.
----------------
अडथळे काय?
- जुन्या रुग्णालय इमारतीच्या जागेवरच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची वास्तू बांधण्यात आली आहे. या वास्तूच्या परिसरात जिल्हा सत्र न्यायालय, पोलिस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तुरुंग आदी वास्तू आहेत.
- हा परिसर अतिसंवेदनशील म्हणून घोषित असून या परिसरात ड्रोन उडवण्यासही बंदी असताना एअर अॅम्ब्युलन्सला परवानगी मिळवताना दमछाक होण्याची स्थिती असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
------
अनेक भागांत रुग्णांचा झाेळीतून प्रवास...
ठाणे जिल्हा रुग्णालयासह अनेक महापालिकांंच्या रुग्णालयांत रुग्णवाहिकांची स्थिती बिकट आहे. कार्डियाक रुग्णवाहिका भाड्याने घेऊन सुविधा पुरवली जात आहे. शहरांत ही स्थिती तर ग्रामीण भागात १०८ क्रमांकाची वरदान ठरणारी रुग्णवाहिका अतिदुर्गम भागापर्यंत पोहाेचत नसल्याचे दिसते. त्यामुळे रुग्णांना आजही झोळी किंवा डोलीतून रुग्णालयापर्यंत घेऊन जावे लागते. यात अनेक वेळा वाटेतच मृत्यू गाठत असल्याचे दिसून आले आहे.
----
..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.