कला-क्रीडा महोत्सवाच्या सभेत मुकेश सावे यांना आदरांजली
विरार, ता. ९ (बातमीदार) : डिसेंबर महिना सुरू होताच ३६ व्या वसई तालुका कला- क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाच्या तयारीला वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या तयारीच्या सभेत कार्यकर्त्यांनी कला क्रीडा विकास मंडळाचे माजी कार्याध्यक्ष दिवंगत मुकेश सावे यांना आदरांजली वाहिली.
कार्याध्यक्ष प्रकाश वनमाळी, उपाध्यक्ष संतोष वळवईकर, माणिकराव दोतोंडे आणि सुरेश ठाकूर यांनी मुकेश सावे यांच्या महोत्सवाच्या साचेबद्ध आखणी, कोमसाप साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्य संमेलन तसेच ‘माही वसई’, ‘कोकण पर्व कोकण सर्व’ आणि ‘भारताची सुवर्णगाथा’ यांसारख्या भव्य प्रदर्शनांमधील झोकून दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. त्यांच्या अवेळी जाण्याने महोत्सवात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ते महोत्सवाचे आधारस्तंभ होते, अशा भावना वक्त्यांनी व्यक्त केल्या.
मुकेश सावे यांच्या ‘शो मस्ट गो ऑन’ या परवलीच्या वाक्याचा आदर करून, यंदा हा ३६ वा महोत्सव महानगरपालिकेच्या आर्थिक सहकार्याशिवायदेखील तितक्याच भव्यतेने आणि उत्साहात आयोजित करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी या वेळी केला. सभेत विभागवार स्पर्धाप्रमुखांनी तयारीचा आढावा घेतला. स्पर्धा प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, अर्ज क्रीडामंडळ वसई येथे सकाळी १० ते १ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत भरता येणार आहेत. मोठ्या संख्येने स्पर्धकांच्या सहभागाची शक्यता लक्षात घेऊन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० डिसेंबरनंतर वाढवण्यावर निर्णय घेतला जाईल, असे आवाहन प्रकाश वनमाळी यांनी केले आहे.