सिडको घरांच्या किमती अवाजवी
आमदार विक्रांत पाटील यांचे नागपुरात आंदोलन
पनवेल, ता. ८ (बातमीदार)ः सिडकोच्या परवडणाऱ्या घरांच्या अवाजवी किमतींविरोधात आमदार विक्रांत पाटील यांनी मंगळवारी नागपूर येथील विधिमंडळाच्या आवारात प्रतीकात्मक आंदोलन केले. या वेळी पाटील यांनी परिधान केलेले जॅकेट लक्षवेधक राहिले.
सिडकोने कमी उत्पन्न गट, मध्यमवर्गीयांसाठी ‘परवडणारी घरे’ अशी जाहिरात करत २५ हजार घरांसाठी लॉटरी काढली होती. या घरांसाठी जवळपास १० हजार अर्जच प्राप्त झाले आहेत, पण घरांच्या किमती ३०-४० लाखांच्या तर काही घरे ६० लाखांच्या पुढे असल्यामुळे ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. त्यामुळे सिडकोच्या अनेक गृहनिर्माण संकुलांमधील घरे विक्रीअभावी रिकामी पडली आहेत. सिडको आणखी घरे बांधत आहे. भविष्यात ही घरे विकली जातील की नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मुळात सिडकोने खासगी बांधकाम व्यावसायिकांना भूखंड विकून मोठी कमाई केलेली आहे. त्याशिवाय पार्किंगस बस टर्मिनल्सच्या सरकारी जागांवर इमारती उभारल्या आहेत. अशा परिस्थितीत जागेचा खर्च नसताना घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा ठेवल्याने आमदार विक्रांत पाटील यांनी तातडीने पुनर्विचार करून करण्याची मागणी अधिवेशनात केली आहे. तसेच यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.