एमसीए निमंत्रित स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांची सुरुवात
पोयनाड, ता. ९ (बातमीदार) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या आंतरजिल्हा (इन्व्हिटेशन) दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण गव्हाण येथे परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच शुभारंभ करण्यात आला. या वेळी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील, छत्रपती शिवाजी महाराज नगर क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष अमित कडू खजिनदार सुजित ठाकूर, सुमित झुंझारराव उपस्थित होते.
बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध दक्षिण विभाग या सामन्याचे आयोजन या वेळी करण्यात आले होते. दुसरा सामना रिलायन्स क्रिकेट मैदान नागोठणे येथे ट्रिनिटी क्रिकेट अकॅडमी विरुद्ध हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांमध्ये सुरू करण्यात आला, तर तिसरा सामना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटस रसायनी पाताळगंगा येथील मैदानावर सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध वायएमसीए क्रिकेट क्लब यांच्यामधील सामन्याला शुभारंभ करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली लेदर बॉल क्रिकेटला नवसंजीवनी मिळत असल्याचे युवानेते परेश ठाकूर यांनी या वेळी मत व्यक्त केले. रायगड जिल्ह्यात चांगल्या दर्जाची मैदाने निर्माण होऊन जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे परेश ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून सातत्याने एमसीएच्या आंतरजिल्हा इन्व्हिटेशन क्रिकेट स्पर्धा होत असल्याने युवा क्रिकेट खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी आरडीसीएच्या वतीने देण्यात येत आहे. एमसीए इन्व्हिटेशन स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील पंच व गुणलेखक काम पहात आहेत. रायगड जिल्ह्यातील विविध मैदानावर चांगल्या दर्जाच्या स्पर्धा होत असल्याने क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.