पिंपरी - महापालिकेचा पदभार 27 एप्रिल 2017 रोजी स्वीकारला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध कामांसाठी कष्ट घेतले आहेत. दिखाव्याऐवजी मूळ पायाभूत कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. शहराला विकासाची संधी आहे. एक चांगले शहर घडणे आवश्यक आहे. त्यासाठी सुरुवातीला शहर परिवर्तनाचा आराखडा तयार केला. त्यासाठी आवश्यक घटक ठरवून काम सुरू केले. सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने नव्हे पण, पथदर्शी काम केले आहे, असे मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.
नोंदणी महानिरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर आयुक्त हर्डीकर पत्रकारांशी बोलत होते. कोणतेही एफडी न मोडता गेल्या चार वर्षांत काम केल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण व झोपडपट्टीतील नागरिकांसाठी पुरेसे काम करू शकलो नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
घरोघरचा कचरा संकलन
महापालिकेचा पदभार स्वीकारला, त्यावेळी कचरा संकलनाबात आंदोलने सुरू होती. त्यामुळे घरोघरचा कचरा संकलनाची यंत्रणा उभारली. मोशी कचरा प्रक्रिया केंद्रातील यंत्रणेचे पुनर्जीवन केले. वेस्ट टु एनर्जी प्रकल्प उभारला. कचऱ्याचे ढीग नष्ट करण्याचे व हॉटेलमधील कचऱ्याबाबत निविदा काढली आहे. कचरा निर्मूलनाचा प्रयत्न सुरू आहे.
पाणीपुरवठा यंत्रणा सुधार
शहरात वीस वर्षांपूर्वी इतकाच पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. त्यात वाढ करण्यासाठी अनेक उपाययोजनांची गरज होती. मात्र, कोणताही स्त्रोत नसताना समन्याय पाणी वितरणासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला. पटत नसला तरी, व्यापक शहरहितासाठी हा निर्णय घ्यावा लागला. त्याची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी नवीन पाणी वितरण प्रणालीची निविदा प्रक्रिया राबवली. 27 नवीन टाक्या व दोन हजार किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षांत ते पूर्ण होईल. सर्व भागात योग्य पाणी मिळेल. सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्राची व रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. पवना जलवाहिनी प्रकल्प पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न केला आहे. आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी घेणार आहोत. त्याची कामे सुरू आहेत. चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे काम लवकरच पूर्ण होईल. नऊ महिन्यात आंद्राचे पाणीही मिळेल. चोवीस बाय सात योजनेतून 40 टक्के भागात काम झाले आहे. मात्र, सध्या पाणी देऊ शकत नाही. जुन्या जलवाहिन्या बदलल्याने दहा टक्क्यांपर्यंत पाणी गळती रोखली आहे.
सांडपाणी व्यवस्थापन
अमृत योजनेतून सांडपाणी व्यवस्थापन केले आहे. दोनशे किलोमीटरच्या वाहिन्या टाकल्या आहेत. सध्या प्रतिदिन 280 दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया करीत आहोत. सांडपाण्याचा पुनर्वापराचे धोरण अवलंबले. त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल.
शहर परिवर्तनाचे धोरण
शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी समाविष्ट गावांमध्ये दीडशे नवीन रस्ते केले. जुन्या रस्त्यांवर पदपथ उभारले. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोचे प्रयत्न केले आहेत. निगडीपर्यंत मेट्रोचा विकास आराखडा केला आहे. त्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. एचसीएमटीआरचा प्रस्तावही आहे. चार बीआरटी मार्ग कार्यान्वित केले. अन्य बीआरटी मार्गांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. स्पाइन रस्त्यावरील त्रिवेणीनगर येथील बाधितांना प्लॉट वाटप अंतिम टप्प्यात आहे. तेही काम लवकरच पूर्ण होईल. मोशी- चऱ्होली- लोहगाव विमानतळ 90 मीटर रुंद रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे कल्याणनगर, खराडी, पुण्याशी कनेक्टिव्हिटी वाढेल. स्मार्ट सिटीत 22 व शहरात सात रस्त्यांचे काम सुरू आहे. हरित सेतू प्रकल्पाची बीजे रोवली आहेत. नवीन आयुक्त व नागरिकांमुळे हा प्रकल्प मार्गी लागेल, याचा विश्वास आहे.
वैद्यकीय सुविधा
वैद्यकीय सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्या सोडविण्यासाठी वायसीएममध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. त्यामुळे 70 डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. कोरोना काळात वायसीएमची सेवा सर्वोत्तम ठरली आहे. अन्य रुग्णालयांचा विस्तार केला आहे. वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे.
परवडणारी घरे व इतर
सर्वांना घरे मिळावी, यासाठी परवडणारी घरे उभारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अन्य शहरांच्या तुलनेत आपल्याकडे घरांचे दर कमी राहिले आहेत. शहराच्या आर्थिक विकासावर भर दिला. नवीन मॉल, नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी दीडशे ई-बस आल्या आहेत. साडेतीनशे ई-बसची ऑर्डर दिली आहे. 450 सीएनजी बस आल्या आहेत. 80 टक्के बस बीआरटी कनेक्टेड आहेत. बालनगरीमध्ये ललित कला अकादमी सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.
शिक्षण विभागात पुरेसे काम करू शकलो नाही, याची खंत आहे. ई-क्लास रूम, स्मार्ट क्लास रूम प्रकल्प राबविला आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. याहूनही अधिक काम करायची इच्छा होती. मात्र, करू शकलो नाही.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.