भोसरी, ता. २ ः उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्सवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह परवानगी विभागाने शहर परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज आणि फ्लेक्स काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच संबंधितांकडून दंड आकारणीही चालू केली आहे. त्यामुळे नवीन वर्षात अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्समुक्त शहर होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अनधिकृत होर्डिंग्ज आणि फ्लेक्स लावण्याचे पेव फुटले आहे. नेत्याचा वाढदिवस, निवड, सण, दुकानाचे उद्घाटन, शुभेच्छा देणे आदींसह विविध कारणांसाठी जागोजागी अनधिकृत फ्लेक्स उभे केले जातात. त्यासाठी अनधिकृत होर्डिंग्जचाही उपयोग केला जातो. हे अनधिकृत होर्डिंग अंगावर पडल्याने काही नागरिकांना जीवालाही मुकावे लागले होते. त्यावेळेस अनधिकृत फ्लेक्सचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
दुकानदारांकडूनही संताप...
शहर परिसरातील महत्त्वाचे चौक, रस्ते आदी ठिकाणी धोकादायकपणे अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग्ज लावण्यात येतात. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणावर भर पडत आहे. काही चौकांत आणि रस्त्याच्याकडेला अनधिकृत फ्लेक्स लावल्याने त्याच्यापाठीमागील दुकानेही झाकली जात असल्याने काही व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कारवाईचा लवकरच आढावा
शहराचे विद्रुपीकरण करणारे आणि नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स काढण्याबाबत उच्च न्यायालयाने १८ डिसेंबर २०२४ निर्णय दिला आहे. त्याचप्रमाणे २५ जानेवारी २०२५ रोजी या कारवाईचा आढावाही उच्च न्यायालयाद्वारे घेतला जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह परवानगी विभागाने कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे अनधिकृत फ्लेक्स होर्डिंग्ज न लावण्याबाबत वृत्तपत्रात निवेदनही प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे नवीन वर्षात शहर परिसर अनधिकृत फ्लेक्स होर्डिंगपासून मुक्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
परवाना क्रमांक लावणे बंधनकारक
प्रत्येक होर्डिंग्जच्याखाली त्याचा नोंदणी क्रमांक, दिनांक आणि ठिकाणाची माहिती असणारा छोटा फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी होर्डिंगखाली अशी माहिती लावली जात नाही. त्याचप्रमाणे परवाना एका जागेचा; तर होर्डिंग दुसऱ्याच जागेवर लावण्याचे प्रकारही घडत आहे. त्याचप्रमाणे परवाना क्रमांकाची पाटी नसल्याने अनधिकृत होर्डिंग्ज कोणते ? आणि अधिकृत होर्डिंग्ज कोणते ? हे प्रशासनाला समजणे अवघड होत आहे.
अशी झाली कारवाई...
दिनांक / हटविलेल्या फ्लेक्स, बॅनर, पोस्टर्स, किऑक्सची संख्या
२७/११/२०२४ ते ०४/१२/२०२४ २८२५९
२७/११/२०२४ ते ०४/१२/२०२४ ८३३५
तीन महिन्यांत ८६ हजारांचा दंड वसूल
शहर परिसरात अनधिकृत बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स, किऑक्स, होर्डिंग्जवर कारवाई करत पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे ८६ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जाहिरातदारांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
शहराचे सौंदर्यीकरण अबाधित ठेवण्याकरिता शहर परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, किऑक्सवर कारवाई करत ते काढण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विनापरवाना होर्डिंग्ज, फ्लेक्सवर दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे होर्डिंग्जखाली परवाना क्रमांक लावण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. प्रदीप ठेंगल, उपआयुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग
पिंपरी-चिंचवड शहरातील आठही प्रभागांत अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज, बॅनरवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. त्याचप्रमाणे
दंडात्मक कारवाईसह फ्लेक्स लावण्याचे साहित्यही जप्त केले जाणार आहे.
- राजेश आगळे, ई प्रभाग क्षेत्रीय अधिकारी
दुकानासमोरच अनधिकृत फ्लेक्स लावण्यात लावले जात असल्याने दुकान झाकून जात आहे. त्यामुळे ग्राहकांना दुकानात येण्यास अडचणही निर्माण होत आहे. त्यामुळे व्यवसायावरही परिणाम होत आहे.
- एक दुकानदार, भोसरी
BHS24B02445
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.