फटाके उडवताय? ही घ्या काळजी
लहान मुलांमध्ये डोळे, त्वचेचे आजार व सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढतेय
अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३१ ः दिवाळी आणि फटाके हे समीकरणच झाले आहे. विशेषतः लहान मुलांना फटाक्यांचे विशेष आकर्षण असते. मात्र, फटाके उडविताना योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे विपरीत परिणाम आरोग्यावर होतात. सध्या शहरात वाढलेल्या प्रदूषणात फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराची भर पडत असल्याने लहान मुलांमध्ये डोळे, त्वचेचे आजार व सर्दी खोकल्याचे प्रमाण या दिवसात वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे फटाके उडवताना काळजी घेण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञ देत आहेत.
हवेतील प्रदूषणात फटाक्यांची भर
पावसाळा संपल्यानंतर हवेतील धुळीचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात रस्त्यांना पडलेले खड्डे व विकासकामे यांच्या मुळे उडणारी धूळ, वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे पावसाळ्यानंतर हवेची गुणवत्ता ढासळते. त्यातच दिवाळीत उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांची भर पडल्याने हवा मोठ्या प्रमाणावर दूषित होते. यामुळे खोकला यांच्यासोबतच त्वचा लाल होणे, डोळ्यांची जळजळ होणे असे आजार उद्भवतात. लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने त्यांच्यामध्ये हा त्रास अधिक प्रमाणात होत असल्याचे डॉक्टर सांगतात.
भाजल्याच्याही घटनांमध्ये वाढ
फॅन्सी फटाके व आकाशात जाणाऱ्या फटाक्यांची भुरळ लहान मुलांना असते. मात्र, असे फटाके उडविताना काळजी बाळगली नाही तर भाजण्याच्या घटना घडू शकतात. नाकातोंडात धूर गेल्याने कृत्रिम ऑक्सिजन देण्याची नामुष्की ओढवते. त्यामुळे उडविताना पालकांनी मुलांच्या सोबत राहणे त्यांना मार्गदर्शन करणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.
काय काळजी घ्यावी
ः- फटाके उडवताना एन ९५ मास्कचा वापर करावा
ः- शक्य असेल तर डोळ्यावर गॉगल घालावा
- कॉटनचे किंवा आग पकडणार नाहीत असे कपडे घालावेत
ः- मोठ्या आवाजाचे फटाके टाळावेत
- फटाके वाजवल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत
काय आहेत दुष्परिणाम
- फटाक्यांचा धूर नाकातोंडात गेल्यास दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे
- अधिक कालावधीपर्यंत होणारा सर्दी व खोकला
- त्वचा लाल होणे, त्वचेला खाज सुटणे
- डोळ्यांमध्ये धूर जाऊन डोळे लाल होणे व डोळ्यातून पाणी येणे
‘‘गेल्या काही वर्षांपासून प्रदूषण वाढल्यामुळे पावसाळा संपल्यानंतर मुलांमध्ये सर्दी, खोकला, न्यूमोनिया यासारखे आजार उद्भवत आहेत. दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता आणखीच ढासळते. अशा वेळी फटाके उडविण्यापूर्वी लहान मुलांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ’
- सचिन शहा, बालरोगतज्ज्ञ
फटाके न फोडणाऱ्यांना बक्षीस
दिवाळीमध्ये पिंपरी-चिंचवडच्या ज्या विद्यार्थ्यांनी एकही फटाका फोडला नाही, वाजवला नाही, त्यांचा सन्मान अंघोळीची गोळी ही संस्था करणार आहे. तसेच लकी ड्रॉद्वारे तीन विद्यार्थ्यांना आणि तीन विद्यार्थिनींना रोख बक्षीस सुद्धा देणार आहे. पहिले बक्षीस तीन हजार रुपये आहे.
दुसरे बक्षीस अडीच हजार रुपये आणि तिसरे बक्षीस दोन हजार रुपये असणार आहे. विद्यार्थी पहिली ते बारावीमध्ये शिकत असावा. फटाके वाजवले नाही हे, दिवाळी संपल्यावर म्हणजे पाच ते १५ नोव्हेंबरपर्यंत आम्हाला कळवावे, असे आवाहन माधव पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.