पिंपरी, ता. १४ ः दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका दिव्यांग भवनतर्फे रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्याअंतर्गत स्पार्क मिंडा आणि बिग बास्केट या कंपन्यांसाठी मुलाखती आयोजित केल्या होत्या. यात ५८७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ जणांना नोकरी मिळाली आहे.
दिव्यांग भवन येथे ‘सेन्टर ऑफ एक्सलन्स’ अंतर्गत दिव्यांग बांधवांच्या रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन महापालिका समाजविकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांच्या हस्ते झाले. दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक परेश गांधी, एनेबल इंडियाचे प्रतिनिधी प्रीती लोबो, स्पार्क मिंडा कंपनीचे सुमेध लव्हाळे, बिग बास्केट कंपनीचे अमोल पवार, सीएसआर सेलच्या श्रुतिका मुंगी आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाल्या, ‘‘संधी, सुविधा आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळाल्यास दिव्यांग नागरिक हे केवळ लाभार्थी नव्हे तर समाजाच्या प्रगतीस हातभार लावणारे घटक बनू शकतात. प्रत्येक कंपनीने, प्रत्येक संस्थेने सामाजिक जबाबदारी म्हणून दिव्यांग व्यक्तींना रोजगाराची संधी द्यावी. सर्वसमावेशक समाज निर्माण करणे हे आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे. समाजात दिव्यांगांविषयी असणारे गैरसमज आणि मानसिक अडथळे दूर करून त्यांना समान संधी द्याव्यात.’’ सूत्रसंचालन दर्शना फडतरे यांनी केले. कुणाल बनुबाकोडे यांनी आभार मानले.
मुलाखतीस उपस्थित उमेदवार
अस्थिव्यंग ः २२
विशेष दिव्यांगत्व ः ३३
लो व्हिजन प्रवर्ग ः २
मूकबधिर प्रवर्ग ः ७
एकूण ः ६४
दृष्टिक्षेप
- बिग बास्केट कंपनीसाठी मुलाखत दिलेल्या २२ पैकी ११ उमेदवारांची निवड
- स्पार्क मिंडा कंपनीसाठी मुलाखत दिलेल्या ४५ पैकी १४ उमेदवारांची निवड
‘‘पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबवत आहे. पण केवळ योजनेतून आर्थिक सहाय्य देण्याऐवजी आपण त्यांना रोजगार देऊन स्वावलंबी बनवणे गरजेचे आहे. दिव्यांगांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे ही प्रशासन आणि समाजाची सामायिक जबाबदारी आहे. संवेदनशीलतेसोबत संधी उपलब्ध झाल्यास दिव्यांग व्यक्तीही अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात.
- ममता शिंदे, उपायुक्त, समाजविकास विभाग, महापालिका
‘‘दिव्यांग युवकांनी कधीही आपल्या स्वप्नांना मर्यादा घालू नये. जे करायचे आहे, जसे बनायचं आहे, त्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संघर्षामुळे तुमच्यात खूप मजबूत सामर्थ्य तयार झाले आहे. तेच खऱ्या अर्थाने बळ आहे. त्यामुळे तुमची क्षमता दाखवण्याची एकसंधी आहे. आत्मविश्वासाने बोला, आपली कौशल्ये वाढवत राहा आणि प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर यश नक्कीच मिळेल.
- निवेदिता घार्गे, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग कक्ष
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.