पिंपरी, ता. २० : अनेक खेळाडू शहराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवत आहेत. पण, त्यांच्या वैद्यकीय गरजांकडे महापालिकेकडून गंभीर दुर्लक्ष होत आहे. खेळताना होणाऱ्या दुखापतींवर मोफत किंवा सवलतीत उपचार करण्यासाठी कोणतीही सुविधा या खेळाडूंना मिळत नाही. काहींना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो, मात्र उपचारांच्या खर्चामुळे काही जणांना खेळाचे प्रशिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत आहे.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहराला खेळाची पंढरीदेखील म्हणतात. कुस्ती, कबड्डी, खो-खो अशा खेळांना शहरात मोठे प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलाला खेळांमध्ये सहभागी करतात. परंतु सराव अथवा स्पर्धेदरम्यान खेळताना हात-पाय फ्रॅक्चर होणे, स्नायूंना इजा होणे, लिगामेंट तुटणे अशा अनेक दुखापती अनेकदा होतात. यावर उपचारासाठी खासगी रुग्णालयात मोठा खर्च येतो. हा खर्च पालकांना स्वतःच्या खिशातून करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने खेळाडूंच्या मोफत उपचाराबाबत योजना राबवाव्यात, अशी मागणी पालक आणि प्रशिक्षकांनी केली आहे.
खेळांडूची स्थिती :
- काही खेळाडूंना सततच्या इजा आणि उपचारांमुळे अपंगत्व आले आहे.
- पुनर्वसनासाठी लागणारी सुविधा शहरातच उपलब्ध नाही.
- महापालिका, क्रीडा प्राधिकरण वा कोणत्याही शासकीय योजनेतून यासाठी मदत मिळत नाही.
महापालिकेचा ठोस आराखडा नाही :
- खेळाडू देशासाठी पदके जिंकतात, प्रतिष्ठा वाढवतात. परंतु, त्यांच्यासाठी शहर पातळीवर वैद्यकीय पायाभूत सुविधा पुरवण्यात अपयश येत आहे.
- महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे क्रीडा वैद्यकशास्त्राशी संबंधित कोणतीही योजना नाही
- खेळाडूंसाठी स्वतंत्र विमा, आरोग्य तपासणी शिबिरे, पुनर्वसन केंद्र किंवा फिजिओथेरेपी सुविधा दिल्या जात नाहीत.
- फक्त खेळाचे मैदान देणे पुरेसे नाही, तर आरोग्य सुविधा असणे ही देखील प्राथमिक गरज आहे.
शासकीय योजनांपासून खेळाडू दूरच
महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना यांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळतो. परंतु या योजनांमध्ये खेळाडूंसाठी स्वतंत्र आरोग्य गट अथवा प्राधान्य नाही. खेळासंबंधी झालेल्या दुखापतीसाठी काहीही तरतूद नसल्यामुळे अनेक वेळा विमा कंपन्याही भरपाई देत नाहीत. त्यामुळे अनेक उदयोन्मुख खेळाडू उपचार सुविधेसाठी धडपडत आहेत.
अपेक्षित उपाययोजना
- महापालिकेच्या रुग्णालयात ‘स्पोर्ट्स इन्ज्युरी युनिट’ सुरू करावे.
- खेळाडूंना मोफत आरोग्य विमा योजना उपलब्ध करून द्यावी.
- खासगी रुग्णालयांसोबत करार करून सवलतीच्या दरात उपचार सुविधा द्याव्यात.
- नियमित आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी आणि पुनर्वसन सुविधा शहरात उभ्या कराव्यात.
- क्रीडा वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांची नेमणूक करावी.
कबड्डी खेळताना आमच्या मुलाला लिगामेंटच्या शस्त्रक्रियेसाठी तीन लाखांचा खर्च सांगण्यात आला. महापालिकेने मदत केली असती, तर आम्ही ती सुविधा सहज घेतली असती. उपचारावेळी आमची ओढाताण झाली.
- सुनील चव्हाण, पालक, भोसरी.
शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना केवळ क्रीडा संधी नाही, तर वैद्यकीय सुरक्षिततेचीही तितकीच गरज आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने पाहून तत्काळ उपाययोजना कराव्यात.
- हर्षल कुलकर्णी, जिम्नास्टिक प्रशिक्षक
खेळाडूंसाठी मोफत वैद्यकीय सुविधेबाबत अद्यापपर्यंत कुठलीही योजना राबविली गेलेली नाही. परंतु खेळाडूंच्या मागणीनुसार योजना सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी पाठपुरावा केला जाईल.
- पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.