सोमेश्वरनगर, ता. ६ ः भीमथडी (बारामती) परिसराचा सरंजाम (अंमल/वतनदारी) बाबूराव नाईक यांच्याकडे येण्यापूर्वी अनेक पिढ्या ‘आटोळे’ घराण्याकडे होता, अशी माहिती एका कैफीयतीच्या माध्यमातून प्रकाशात आली आहे. कैफीयतीमध्ये दस्तुरखुद्द छत्रपती शाहू महाराजांनी बारामती हद्दीतील गोजुबावी व कटफळ ही गावे इनाम दिल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे.
बारामतीचा पराक्रमाचा इतिहास पेशव्यांचे नातेवाईक व सावकार बाबूराव नाईक यांच्या पलिकडे जात नव्हता. मात्र पंधराव्या शतकात तरडोली येथे चौदा गावच्या सगर योद्ध्यांनी तुर्की आक्रमकांशी लढा दिल्याचा तर तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार मलिक काफूरच्या सैन्याशी गुनवडी येथे करणसिंग गावडे या योद्ध्याने तेराशे जणांसह हातघाईची लढाई केल्याचा इतिहास नुकताच समोर आला आहे. आता बारामतीचा सरंजाम स्थानिक आटोळे पाटील यांच्याकडे पिढ्यानपिढ्या होता, हेही समोर आले आहे.
क्षत्रिय सगर राजपूत (सगर मराठा) सेवा संघटना इतिहास शोधत आहे. याचाच भाग म्हणून गोजुबावीचे अॅड. काकासाहेब आटोळे यांनी पुण्यातील पुराभिलेखागारातून मोडी लिपितील कैफियत मिळविली असून संदीप बेंद्रे यांनी लिप्यंतर केले आहे. इंग्रज सरकारने सर्व संस्थाने खालसा केल्यानंतर इनाम मिळालेल्या लोकांकडून पुरावे मागितले होते. त्यानुसार असिस्टंट इनाम कमिशनर कोपरसाहेब यांनी गोजुबावीचे अहिलोजी पाटील आटोळे आणि कटफळचे अमृतराव पाटील आटोळे यांना इंदापूरच्या कारकुनामार्फत लखोटा पाठविला होता. त्यानुसार अहिलोची बिन संताजी आटोळे यांनी सुभा अहमदनगर, परगणा सुपे आणि तालुका इंदापूरचे कलेक्टर काटजरेसाहेब व अधिकारी रॉबर्टसन यांच्याकडे आपली लेखी कैफियत सादर केली होती.
कैफीयतीनुसार, भीमथडीचा मोकासा (महसूलाचा अधिकार) व सरंजाम आटोळे घराण्याकडे वंशपरंपरेने होता. तो मूळ कुणी व कधी दिला हे कैफियतकारास सांगता आले नाही मात्र सात पिढ्यांपासून बिनदिक्कीत चालत आल्याचे आणि बाबूराव सदाशिव नाईक यांना बारामती सरंजामासाठी मिळाला तोपर्यंत सर्व गावावर अंमल असल्याचे मांडले आहे. नाईकांनी सर्व अंमल घेतल्यानंतरही एक मोकासा अंमल आमच्याकडे दिला, असेही अहिलोजीने नमूद केले आहे. त्यानुसार शेकडा बारा रुपयेप्रमाणे योगक्षेमाकरिता गोजुबावीचा मोकासा वंशपरंपरेने आला होता तर नाना अमृतराव पाटील आटोळे हे कटफळचे वहिवाटदार वारस आहेत तर येसाजी पाटील आटोळे दूरचे भाऊबंद असल्याचेही कैफीयतकार नमूद करतो.
गोजुबावीत प्रसिद्ध समाधी
अभ्यासक रणजित ताम्हाणे म्हणाले, कैफीयतीने कऱ्हाकाठच्या बारामतीच्या इतिहासाला झळाळी मिळाली आहे. आजही बारामती परिसरातील कटफळ गावातील आटोळेंना मोकाशी हेच आडनाव आहे. गोजुबावीतही एक प्रसिद्ध समाधी असून आटोळे आडनावाचे लोक राहतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.