गुनाट, ता. १८ ः करडे (ता. शिरूर) येथे बेकायदेशीर मुरूम उत्खननाने पुन्हा डोके वर काढले आहे. सरकारी मालमत्तेचा महसूल बुडविणाऱ्या अशा बेकायदेशीर मुरूम माफियांवर धडक कारवाई करण्याऐवजी महसूल विभागाचे कर्मचारी त्याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
येथील गट क्रमांक ५७० मध्ये श्रीकांत देशमुख या व्यक्तीने २०० ते ३०० ब्रास मुरमाचे बेकायदेशीरपणे उत्खनन केल्याची तक्रार संतोष देवरे यांनी तहसीलदार कार्यालयात केली. याची गंभीर दखल घेत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश संबंधित मंडलाधिकारी यांना दिले. मात्र, आदेश देऊनही दीड महिना उलटला तरी उत्खनन केलेल्या जागेचा मंडलाधिकारी यांनी पंचनामा न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, मुरूम उत्खनन करताना संबंधित गटाची कागदपत्रे दाखवून शासनाच्या परवानग्या घेऊन त्यासाठीची रॉयल्टी भरावी लागते. त्यानंतरच उत्खनन करण्याची परवानगी मिळते. एकीकडे प्रशासनाची अशी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता औद्योगिकीकरणामुळे करडे परिसरात मुरूम उत्खननाचा धंदा तेजीत आहे. दुसरीकडे बेकायदेशीर मुरूम उत्खननावर कारवाई करण्याचे आदेश असतानाही महसूल कर्मचारीच त्यातून सरकारी कामांची पळवाट काढत असल्याने मुरूम लॉबीला आणखीनच सरकारी पाठबळ मिळत आहे. परिणामी तक्रार करणाऱ्या नागरिकांना दहशतीच्या सावटाखाली राहावे लागत आहे.
महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज
दोन वर्षांपूर्वी मुरूम उत्खननातूनच तरुणांच्या दोन गटात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे शासकीय राजकीय आणि सामाजिक अशा तीन ही ठिकाणी पडसाद उमटले होते. त्यामुळे महसूल विभागाने अशा घटनांकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.
या प्रकरणाच्या पंचनाम्यासाठी नियमित केलेल्या तारखांच्या दिवशीच महसूल विभागाची कामे आल्याने या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. पुढील तीन- चार दिवसांत पंचनामा करण्यात येईल.
- नंदकुमार खरात, मंडलाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.