कोळवण, ता. २० : निसर्ग संपन्न व जैवविविधतेने नटलेला मुळशी तालुका पर्यटकांना नेहमीच साद घालतो. तालुक्यामधील कोळवण खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत. स्वच्छ व प्रदूषणमुक्त हवा, हिरवेगार डोंगर, डोंगरावरून फेसाळत कोसळणारे धबधबे, नयनरम्य परिसर, डोंगर उतारावरील भातशेती, खळखळ आवाज करत वाहणारे ओढे, मधूनच दिसणारा इंद्रधनुष्य तसेच येथून दिसणारा सूर्योदय- सूर्यास्त अशी अनेक निसर्गाची मनमोहक रूपांची भूरळ पर्यटकांना पडते. निसर्गाच्या कृपेमुळे अनोख्या मुळशी पॅटर्नचा पर्यटकांना अनुभव घेता येतो.
पुण्यातून चांदणी चौक -पिरंगुट -पौडपासून उजवीकडे वळल्यास साधारणतः १२ किलोमीटर वर कोळवण हे गाव असून पूर्व, पश्चिम-दक्षिण- बाजूला सह्याद्रीची डोंगररांग तसेच उत्तरेला पर्यटकांचे आकर्षण असणारा उत्तुंग असा तिकोना किल्ला, डोंगर रांगेमध्ये असलेल्या सपाट भूभागातून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येणारी वळकी नदी, वळकी नदीच्या दोन्ही बाजूला डोंगर पायथ्याला वसलेली गावे आहेत.
कृषी पर्यटनातील विविध प्रकार
१. टेन्ट कॅम्पिंग, शेतघर, कृषी पर्यटन
२. आधुनिक सुविधा असलेले स्वीमिंग पूल
३. विलाज, फार्म हाऊस, कॉन्फरन्स हॉल, ट्री हाउस
४. जंगल सफारी, साहसी खेळ, बोटिंग, पक्षी निरीक्षण
५. ग्रामीण गावरान रुचकर भोजनाचा आस्वाद
६. फॅमिली पिकनिक, सेमिनार, डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग शूट, स्नेह मेळावे, आकाश दर्शन
कोळवण खोऱ्यातील पर्यटन स्थळे
* वाळेण व हाडशी धरण
* गिरीवन -ढेपे वाडा
* मांडवी धबधबा
* सत्यसाई, पांडुरंग क्षेत्र हाडशी येथील संतदर्शन
* कोळवणमधील चिन्मय विभूती येथील श्रीगणेश मंदिर,
* स्वानुभुती वाटिका, स्वामी तेजोमयानंद यांचा क्रिस्टल व मेणाचा पुतळा
* चिन्मय जीवन दर्शन
* श्रीक्षेत्र भालगुडी येथील स्वयंभू नारायणदेव मंदिर,
मुळशी तालुक्यातील निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटन व्यवसाय झपाट्याने वाढू लागला आहे त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात पर्यटनाला पूरक व्यवसाय संधी निर्माण झाली आहे. पर्यटन व्यवसायासाठी विविध बॅंकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होत आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून आई योजना व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या वतीने सीएमईजीपी या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभही मिळू लागला आहे.
- दत्ता शेळके, संचालक युनिक पाथस कृषी पर्यटन केंद्र
युवकांमुळे पर्यटन व्यवसायात झपाट्याने वाढ
मुळशी-भोर-राजगड विधानसभा मतदारसंघ आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने तसेच संत महंताच्या पदस्पर्शाने पावन झालेला निसर्ग संपन्न असा भाग आहे. गाव खेडे ते थेट आयटी पार्क अशी विविधता येथे आढळते. त्यामुळेच येथे पर्यटक आकर्षित होत आहेत. प्रशासनाच्या सहकार्याने विशेष करून मुळशीतील कोळवण भागात स्थानिक युवकांच्या पुढाकाराने येथील पर्यटन व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा रस्ते, वीज, पाणी, दळणवळण सुविधा सह स्वयंरोजगार, रोजगार, घनकचरा व्यवस्थापन, विविध बँकांच्या माध्यमातून अर्थसहाय्य, शासकीय योजना यासारख्या बाबीवर लक्ष केंद्रित करून पर्यटनाला चालना देण्यासाठी माझे कायम प्रयत्न राहतील, असे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले.