कोळवण, ता. १८ ः मुळशी तालुक्यात किती ठिकाणी आधार केंद्र सुरू आहेत? आधार केंद्र सुरू आहेत, तर ती आधार केंद्र परवानगी घेतलेल्या अधिकृत ठिकाणी सुरू आहेत का? तसेच तालुक्याचे मुख्य कचेरीत आधार कार्ड मशिन ठेवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे स्वराज्य पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख राजू फाले यांनी केली आहे. यावेळी फाले यांनी सांगितले की, ‘‘आधार केंद्रांबाबत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना सूचना केली तर आधार संबंधित दुरुस्ती, लिंकिंग करणे, अपडेट करणे, नवीन काढणे या कामांसाठी विद्यार्थी, शेतकरी, कामगार, शासकीय योजना लाभार्थी नागरिक यांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास थांबेल.’’