माळशिरस, ता. २० : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांबरोबर जिल्हा व तालुका प्रशासनात समन्वय ठेवून काम सुरळीतपणे करण्यासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. सरळ सेवेच्या माध्यमातून हे पद सात वर्षांत भरलेच गेले नाही. जिल्ह्यात सरळ सेवेच्या माध्यमातून सर्व १५१ जागा रिक्त असून पदोन्नतीच्या माध्यमातून ७३ केंद्रप्रमुख कार्यरत आहेत, तर ७९ जागा बदली प्रक्रिया पोर्टलमुळे सध्या रिक्त आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यात ३०३ केंद्रप्रमुखांपैकी फक्त ७३ केंद्रप्रमुखांच्या साह्याने शिक्षण व्यवस्थापनाचे कामकाज चालू असल्याने एका केंद्रप्रमुखावर अनेक केंद्रांचा पदभार जादा स्वरूपात सांभाळण्याची वेळ आली आहे.
शासन धोरणानुसार केंद्रप्रमुखाच्या एकूण जागांमधील ५० टक्के जागा या पदोन्नतीने व ५० टक्के जागा सरळ सेवा पद्धतीने भरण्याचे निश्चित केले आहे. या ५० टक्के जागा सरळ सेवा पद्धतीने भरण्याचा निर्णय सात वर्षांपूर्वी होऊनही अद्याप याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सर्वच जागांवरील पदे रिक्त असल्याने याचा भार पदोन्नतीने येणाऱ्या केंद्रप्रमुखावर जादा स्वरूपात पडत आहे. त्यातच पदोन्नतीने निश्चित केल्या जाणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या जागांबाबतही बदली पोर्टल प्रक्रियेमुळे विलंब होत आहे. यामुळेच सध्या कार्यरत असणाऱ्या एका केंद्रप्रमुखाला दोन ते चार जागांचा पदभार सांभाळावा लागत आहे.
पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या ३०३ केंद्रप्रमुखांपैकी ५० टक्के जागेच्या निकषानुसार १५१ सरळ सेवेतील जागा या सध्या भरती प्रक्रिया न झाल्याने रिक्त आहेत. उर्वरित पदोन्नतीवरील जागांमधील ७३ केंद्रप्रमुख हे कार्यरत आहेत तर ७९ जागा रिक्त आहेत. शिक्षक बदली पोर्टल प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने जिल्हा शिक्षण विभागाला याबाबत अंतिम प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. शाळा सुरू होऊन महिना होऊनही ही प्रक्रीया रखडलेली आहे.
एकट्या पुरंदर तालुक्याची परिस्थिती पाहता तालुक्यामध्ये २१८ जिल्हा परिषद शाळा असून १८ केंद्र आहेत. या १८ जागेमधील सरळ सेवा भरतीतील कोणीही कार्यरत नाही तर पदोन्नतीनुसार सहा जण कार्यरत असून त्यातील एक जण या महिन्यात सेवानिवृत्त होत आहे. यामुळेच या कार्यरत केंद्रप्रमुखांवर जादा केंद्रांचा कार्यभार आहे. यामध्ये प्रवीण इंदलकर यांच्याकडे काळदरी केंद्राचा पदभार असून ते जादा स्वरूपात वीर व माहूर येथील कामकाज पाहत आहेत. प्रताप मेमाणे यांच्याकडे दिवे केंद्राचा पदभार असून ते जादा स्वरूपात चांबळी केंद्राचे काम पाहतात. चिंतामण अद्वेत यांच्याकडे गराडे येथील पदभार असून ते जादा स्वरूपात नीरा येथील कामकाज पाहतात. बाळासो कोलते यांच्याकडे राजेवाडी येथील पदभार असून ते यादव वाडी, पिसर्वे, राजुरी या इतर तीन केंद्रांचा जादा स्वरूपात कामकाज पाहतात. निवृत्ती नाजीरकर यांच्याकडे सुपे खुर्द येथील पदभार असून ते वाल्हे, नाजरे सुपे व राख येथील केंद्रांचेही कामकाज पाहतात. अनिल जगदाळे यांच्याकडे वाळूंज केंद्राचा पदभार असून त्या व्यतिरिक्त ते धालेवाडी केंद्राचेही कामकाज पाहत असून या महिन्यात ३१ जुलैला ते सेवानिवृत्त होत असल्याने ही देखील जागा लवकरच रिक्त होणार आहे. केंद्रप्रमुखांच्या या अपुऱ्या संख्येमुळे पदवीधर असणारे गणेश मेमाणे यांच्याकडे भिवडी येथील तात्पुरता स्वरूपात केंद्रप्रमुखाचा पदभार आहे. यावरुन इतर तालुक्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज येतो.
पदभारामुळे अतिरिक्त ताण
जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या रिक्त जगांमुळे बहुतांश तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी पदवीधर असणाऱ्या शिक्षकांकडे जादा स्वरूपात केंद्रप्रमुखपदाचा पदभार आहे. या शिक्षकांना शाळेचे शिकवणीचे वर्ग सांभाळून केंद्रप्रमुखाचे कामकाज करावे लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण तर पडत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
मुख्याध्यापकाची पदेही रिक्त
केंद्रप्रमुख पदाप्रमाणेच जिल्ह्यात मुख्याध्यापकांची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामुळेच शाळेत कार्यरत असणाऱ्या
शिक्षकांना मुख्याध्यापकांची आवश्यक कामे करावी लागत असल्याने त्यांना अध्यापनाच्या कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी आपला वेळ द्यावा लागत आहे. यामुळे या रिक्त जागा तातडीने भरणेही तितकेच गरजेचे आहे.
शिक्षक बदली प्रक्रिया पोर्टल अद्याप सुरू आहे. हे पोर्टल संपल्यानंतर केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया त्वरित पूर्ण होईल. त्यासाठीची आवश्यक तयारी केलेली आहे. शिक्षक बदली पोर्टल बंद झाल्यानंतर तत्काळ नवीन पदोन्नतीनुसार केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक कार्यरत होतील.
- संजय नाईकवाडे, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.