पुणे, ता.९ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स कबड्डी स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात भिलारेवाडीच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूल (ब-एक) ने जेतेपदाची ‘अव्वल पकड’ घेतली. कात्रजचे सरहद स्कूलचा संघ उपविजेता राहिला.
नेहरु स्टेडियम येथील पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सरहद स्कूलने चढाईस सुरुवात केली. मात्र, आर्यन्स वर्ल्डच्या खेळाडूंनी सरस खेळ केला. पहिल्या डावात आर्यन्स वर्ल्ड संघाने आक्रमक खेळ दाखवत लोनचे २ गुण आणि बोनसच्या आठ गुणांसह एकूण ३२ गुण वसूल केले. याउलट, सरहद संघाला बोनसच्या ३ गुणांसह एकूण १९ गुणांची कमाई करता आली. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर सरहद संघाला दुसऱ्या डावात ती भरून काढता आली नाही. या डावात संघाला केवळ ६ गुण वसूल करता आले. तर आर्यन्स वर्ल्डने याही डावात लोन चढवत २ गुण आणि एका बोनससह एकूण १२ गुणांची कमाई करत सामना ४४-२५ असा १९ गुणफरकाने जिंकला.
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलने आर्यन्स वर्ल्ड स्कूल (ब-दोन) संघावर ३४-२६ असा आठ गुणफरकाने विजय मिळविला. आर्यन्स वर्ल्ड स्कूलने चढाई करण्याचा निर्णय घेतला. मात्र, खेळाडूंना त्याचा फायदा घेता आला नाही. संघाला पहिल्या डावात २ बोनससह एकूण ५ गुणांचीच कमाई करता आली. याउलट, नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी संघाने प्रेक्षणीय खेळ करत लोनच्या २ गुण आणि बोनसच्या ३ गुणांसह एकूण १८ गुण वसुल केले. मात्र, दुसऱ्या डावात आर्यन्स वर्ल्डच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ दाखविला. अव्वल पकडचा एक, लोन चढवत २ गुण आणि बोनसच्या ४ गुणांसह एकूण २१ गुण वसूल केले. परंतु, संघाला विजय मिळवून देण्यात ते अपुरे पडले. नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलने दुसऱ्या डावात आणखी एक लोन चढवत २ गुण आणि बोनसचे ३ गुण असे एकूण १६ गुणांची कमाई केली. त्यामुळे या संघाकडे विजयाचे पारडे फिरले.
विजेत्या आर्यन्स वर्ल्ड संघाला प्रशिक्षक प्रमोद पायगुडे, नवनाथ कोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. उपविजेत्या सरहद स्कूल संघाला प्रशिक्षक विनायक बिरजे, अनिकेत गावडे यांनी तर ब्राँझपदक विजेत्या नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलच्या संघाला किरण बागुल यांनी मार्गदर्शन केले.