सासवड, ता. १९ : पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्पबाधित खानवडी गावात निवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांच्या पत्नीच्या नावावरील तब्बल चार एकर जमीन बनावट कागदपत्रे आणि व्यक्ती उभी करून हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी शैलेश कोतमिरे यांच्या पत्नी अर्चना शैलेश कोतमिरे (रा. घोले रोड, शिवाजीनगर, पुणे) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधार नवनाथ गोरख कापरे, अर्चना कोतमिरे यांच्या नावाचा गैरवापर करणारी बोगस महिला, दस्तऐवज तयार करण्यास मदत करणारे विवेक विजय इंगळे (रा. वाळुंज, ता. पुरंदर), तसेच दस्ताकरिता साक्षीदार म्हणून उपस्थित राहिलेले विक्रांत पवार (रा. सासवड), सूरज खेंगरे (रा. खेंगरेवाडी, सासवड), पंकज कुमार (रा. जगदीशपूर, ता. बाग्रास, जि. बेगुसराई, बिहार) आणि लक्ष्मण यादव (रा. हडपसर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना कोतमिरे यांच्या नावे खानवडी येथील गट नंबर २२०/१मध्ये २०१७ मध्ये एक एकर आणि सन २०२४मध्ये तीन एकर जमीन राजेश धनराज राठी यांच्याकडून खरेदी केली होती. दरम्यान, शिरीष शहा नावाच्या एका व्यक्तीने या जमिनीच्या व्यवहाराबाबत कोतमिरे कुटुंबाशी संपर्क साधला. त्यामुळे संशय आल्याने कोतमिरे यांनी दस्त नोंदणी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता दुय्यम निबंधक पुरंदर कार्यालयात नोंदणीकृत साठेखत व कुलमुखत्यारपत्र तयार करून त्यावर बोगस सह्या करून जमिनीची परस्पर विक्री केल्याचे उघड झाले. सासवड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी अधिक तपास करत आहेत.
पुरंदर तालुक्यात विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींना आलेला भाव आणि दलालांचा वाढलेला वावर यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले असून, यामागे मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही शोध घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.