पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २४ : एरवी आपले कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या घरी दिवाळीनिमित्त भेट देऊन कौटुंबिक आनंद साजरा केला जातो. मात्र, शुकवारी सकाळी चिंचवडच्या श्रीधरनगर येथील ‘वसंत स्मृती’मधील स्नेहमेळावा त्यास अपवाद ठरला. या स्नेहमेळाव्यात फक्त एका कुटुंबातीलच नव्हे, तर विविध जाती-धर्मासह विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आपापल्या कुटुंबासह एकत्र आल्या, त्यांनी फक्त वैचारिक देवाणघेवाणच केली नाही, तर समाजातील सद्भावनेला साद घालत माणुसकीचे नाते अधिक दृढ करण्याचा पहिला ‘दिवा’ चेतविला. निमित्त होते, सद्भाव सभेचे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘पंच परिवर्तन’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यातील सामाजिक समरसता या विषयानुसार प्रांत कार्यकारिणी सभेचे सदस्य व सामाजिक समूहप्रमुख हेमंत हरहरे यांच्या पुढाकाराने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता चिंचवडच्या श्रीधरनगर येथील वसंत स्मृती येथे विशेष स्नेहमेळावा व दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दभडघाव, विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष ललित झुनझुनवाला, पत्रकार योगिता साळवी, हेमंत हरहरे, सद्भाव प्रमुख बाळासाहेब दळवी, प्रांत संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे, जेजुरी देवस्थान ट्रस्टचे अनिल सौंदाडे, विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, बौद्ध जन विकास समितीचे विजय कांबळे, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील कार्याची माहिती सांगून डॉ. दभडघाव म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त सद्भाव सभा घेऊन जाती-ज्ञातीमधील विषमता दूर करण्यावर भर दिला आहे. देशाची प्रगती कुठल्याही विषमतेने होणार नाही, तर देशाची प्रगती ही समानतेनेच होणार आहे. त्यामुळेच सर्व समाजात समता, समरसता निर्माण करण्याचे काम संघाने हाती घेतले. सातत्याने सद्भाव कार्यक्रम घेतले, तरच समानता निर्माण होऊ शकणार आहे. अशा कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची गरज आहे.’’
स्व-बोधी, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य, सामाजिक समरसता, पर्यावरण या पंच परिवर्तनाचे महत्त्व विशद करून हरहरे यांनी सामाजिक समरसता या याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शाहीर आसाराम कसबे व शिवाजीराव पोळ यांनी पारंपरिक पद्धतीने ‘नारा समतेचा देऊया’ हे भारुड सादर करून उपस्थितांची मने जिंकली. राकेश पाचंगे व विकास खंदारे यांनी चौघडावादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित हरहरे यांनी केले.
असे रंगले स्नेहसंमेलन !
चौघडावादनाने सुरू झालेल्या ‘सद्भाव सभा’ कार्यक्रमात विविध जातिधर्माच्या, विविध क्षेत्रांतील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह आनंदोत्सहाने सहभाग घेतला. स्वतःची, कुटुंबाची खास ओळख करून देत एकमेकांशी सुसंवाद साधला. आपापल्या क्षेत्रात सुरू असलेल्या कामाची माहिती देत सामाजिक कार्याचे, विविध जातिधर्मांना जोडण्यावरही खुलेपणाने चर्चा केली. पुस्तकासह विचारांचीही देवाणघेवाण करत दिवाळीच्या फराळाचा एकत्रित आस्वाद घेतला. तसेच जातिधर्मांना जोडून माणुसकीचे नाते दृढ करण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.