पुणे, ता. १२ : ‘मनाचें जें चंचळपण| तें आवरुनि करावें ध्यान||’ अशा शब्दांत ध्यानाचे महत्त्व समजवणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज; तर ‘आहे तैसा चि बरा| परि नाही नाही ते करा||’, अशा शब्दांत समाधानाची महती सांगणारे जगद्गुरू तुकाराम महाराज. संतांनी आपल्या साहित्यातून जीवनातील अनेक पैलूंवर मौलिक भाष्य केले आहे. या शिकवणीचा ‘अमृतानुभव’ घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
निमित्त आहे, ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवाचे. या महोत्सवांतर्गत ५ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‘अमृतानुभव’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सवानिमित्त ही कलाकृती सादर केली जाणार आहे. ‘सुहाना मसाले’ हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक असून विश्वकर्मा विद्यापीठ हे सहप्रायोजक आहेत.
संतसाहित्य आणि तत्त्वज्ञान यांची रोजच्या अनुभवांशी सांगड घालून गीत सादरीकरण आणि निरुपण स्वरूपात हा कार्यक्रम सादर होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत बहिणाबाई अशा अनेक संतांच्या रचना या कार्यक्रमात ऐकायला मिळतील. पारंपरिक भजन, कीर्तन आणि आधुनिक भक्तिगीतांचा मेळ या कार्यक्रमात पाहायला मिळेल.
या कार्यक्रमाचे लेखन-दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांचे आहे. ज्येष्ठ गायक रघुनंदन पणशीकर, ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, गायिका मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, राहुल जोशी, आनंदी जोशी हे गायक कलाकार यात सहभागी होणार आहेत. अभिनेते संकर्षण कऱ्हाडे हे कार्यक्रमाचे निवेदन करणार असून ते निरुपणातून संतांची शिकवण उलगडणार आहेत. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन सचिन इंगळे यांचे आहे. या कार्यक्रमाची तिकिटे आरक्षित करण्यासाठी बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाने केले आहे.
आनंदी जीवनासाठी मार्गदर्शक
संतांनी महाराष्ट्राच्या जनजीवनाची आणि भावविश्वाची आध्यात्मिक बैठक भक्कम केली. संतांचे विचार आणि शिकवण, केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नव्हे, तर एक निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. हीच शिकवण या कार्यक्रमातून उलगडणार आहे.
‘अमृतानुभव’ कार्यक्रम
कधी : ५ डिसेंबर
केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता
कुठे : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.