पुणे, ता. २६ ः पुण्यात सध्या रक्तसाठ्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे, अनेक रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत. शहरातील ३५ रक्तपेढ्यांपैकी बहुतेक पेढ्यांमधील रक्तसाठा हा ३० टक्क्यांच्या आसपास आला असून बहुतांश रक्तपेढ्यांकडे केवळ चार ते पाच दिवस पुरेल इतकाच साठा आहे. त्यामुळे, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येत आहे.
शहरातील ससूनसारखे सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भसते. परंतु गेल्या काही आठवड्यांपासून सर्व गटांतील रक्तसाठा प्रामुख्याने लाल रक्तपेशींचा साठा झपाट्याने कमी झाला आहे. विशेषतः ‘ओ पॉझिटिव्ह’या दुर्मिळ रक्तगटांचा साठा जवळपास संपुष्टात आला असून त्यासाठी रुग्ण व नातेवाइकांची धावपळ होत आहे. तर, रुग्णालये नातेवाइकांना रक्तपिशवीच्या बदल्यात रक्तदान करायला सांगत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून हा तुटवडा भासत आहे. परिणामी, अपघातग्रस्त, थॅलेसिमिया, कर्करोग तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना आवश्यक तेवढे रक्त मिळणे कठीण झाले आहे.
अशी आहे स्थिती
१) पुण्यात दररोज सुमारे १५०० पिशव्या रक्ताची गरज
२) सध्या केवळ ४०० ते ५०० पिशव्या उपलब्ध
३) पंधरा दिवसांपासून तुटवडा आहे
शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्था, निवासी संकुले, आयटी कंपन्यांमध्ये रक्तदान शिबिरे घेण्याची गरज आहे. रक्तदान हा सुरक्षित असून एका रक्तदात्याने दिलेले रक्त तीन वेगवेगळ्या रुग्णांचे प्राण वाचवू शकते. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या रक्तपेढीत केवळ काही मिनिटांचा वेळ देऊन समाजसेवेचा हा महत्त्वाचा भाग बनणे आवश्यक आहे. पुण्यातील वाढत्या लोकसंख्येसोबत अपघात आणि आजारांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने रक्तसाठ्याची मागणी वाढत आहे. रक्तपेढ्यांनी वेळीच नियोजन केले तर या तुटवड्यावर मात करता येणे शक्य आहे.
- राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट
आमच्या रक्तपेढीची क्षमता एक हजार रक्तपिशव्यांची आहे. मात्र, सध्या केवळ ३००च्या आसपास रक्तपिशव्या शिल्लक आहे. लाल रक्तपेशींच्या घटकाची गरज जास्त आहे. हा रक्तसाठा पुढील ४ ते ५ दिवसांसाठीच पुरू शकतो. रक्तदान शिबिरे हे दोन नोव्हेंबरपासून सुरू होतील. परंतु, तोपर्यंत होणारा तुटवडा टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करायला पुढे यायला हवे. तसेच एखाद्या ठिकाणी ३० ते ४० रक्तदाते असतील तरी त्या ठिकाणी येऊन आम्ही रक्तदान शिबिरे घेऊ शकतो.
- डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.