पुणे, ता. २७ ः राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चांदीच्या भावात झपाट्याने वाढ होत आहे. दिवाळीनंतरही या वाढीचा कल कायम राहिला आहे. यामागे चांदीच्या वाढत्या मागणीसह पुरवठ्याची मर्यादा, औद्योगिक क्षेत्रातील वाढता वापर, आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणूकदारांची वाढती आवड अशी अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
सध्या चांदीचा वापर केवळ दागिन्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सौरऊर्जा पॅनेल, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी उत्पादन आणि वैद्यकीय उपकरणांमध्येही चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. या वाढत्या औद्योगिक वापरामुळे बाजारातील मागणी अधिक वाढली असून, पुरवठा त्यानुसार वाढलेला नाही. त्यामुळे भाववाढीचा दबाव निर्माण झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या बड्या बाजारपेठांमध्ये चांदीची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. या ठिकाणी गेल्या वर्षभरात चांदीचा भाव प्रति किलो सुमारे ३० टक्क्यांनी वाढला आहे.
यामुळे वाढले भाव ः
डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने आयात होणाऱ्या मौल्यवान धातूंचे दर वाढले आहेत. तसेच जागतिक स्तरावर चांदीचा साठा मर्यादित असून खाण उत्पादनातही घट झाली आहे. काही देशांमध्ये औद्योगिक मागणी वाढल्याने निर्यात कमी झाली आहे. याशिवाय, गुंतवणूकदारांनी सोन्याच्या तुलनेत चांदीकडे वळण्यास सुरवात केली आहे, कारण चांदी स्वस्त आणि भविष्यात जास्त परतावा देणारा पर्याय म्हणून ओळखली जात आहे.
दसरा-दिवाळीच्या व्यवहारावर परिणाम ः
दसरा आणि दिवाळीच्या मागणीत सोन्यासह चांदीची मागणी वाढते. मात्र, यंदा आगाऊ बुकिंग करून देखील आवश्यक तेवढी चांदी मिळाली नाही. त्यामुळे मागणी असूनदेखील पुरवठा करता आला नाही. त्याचा परिणाम यंदाच्या दसरा आणि दिवाळीतील व्यवहारांवर झाला, अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
‘‘गेल्या काही महिन्यांत सोने आणि चांदीचा भाव झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे नागरिक दागिने बनवण्यापेक्षा गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने आणि चांदीची खरेदी करत आहेत. दागिन्यांसाठी होणारी चांदीची खरेदी हे एकूण खरेदीच्या जास्तीतजास्त २५ टक्के आहे. आपल्याकडे चांदीचा कोणताही स्रोत नाही. त्यामुळे आपण ऑस्ट्रेलिया, आफ्रिका अशा देशांतून ती आयात करतो. ज्या देशातील भाव कमी आहे, तेथून जास्त आयात होते. युद्ध आणि अमेरिकेची बदलती धोरणे देखील चांदीवर परिणाम करत आहेत.
- सतीश भोजे, संस्थापक अध्यक्ष, हुपरी परिसर सराफ असोसिएशन, कोल्हापूर
सोन्या चांदीचे भाव (सोने प्रति दहा ग्रॅम)
तारीख २४ कॅरेट - २२ कॅरेट - चांदी (१ किलो)
२०-१०-२०२५ - १,२७,४६२ - १,१७,३६६ - १,७१,०००
१०-०२-२०२५ - ८५७७९ - ७८७७३ - ९५८५०
१७-०३-२०२५ - ८८,३३५ - ८१३३८ - १,०१,८००
१७-०३-२०२४ - ६५८१२ - ६१२५० - ७४,८५०
१७-०३-२०२३ - ५८५८० - ५४५२० - ६७,३५०
१७- ०३-२०२२ -५१७६३ - ४९४५६- ६८,३००
१७-०३- २०२१ - ४५१९८ - ४३१८४ - ६८,५००
१७-०३- २०२० - ४०५०० - ३८८९० - ३७,१००
(सोर्स - कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स)
चांदीच्या भावावर परिणाम करणारे महत्त्वाचे मुद्दे ः
- जगात सुरू असलेले युद्ध
- डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण
- वाढती औद्योगिक मागणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.