पुणे, ता. ३१ ः गृहप्रकल्पातील प्रत्येक सदनिकाधारकाला वैयक्तिक मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा असलेले पुरवणी प्रॉपर्टी कार्ड (व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड) देण्यासाठी नव्याने नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. एक महिन्यांच्या आत या समितीकडून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.
सदनिकांबाबत मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महापालिकेकडे कर भरल्याची पावती आणि खरेदी-विक्री करारनामा एवढाच दस्त उपलब्ध असतो. ज्या जागेवर इमारत उभारली आहे. त्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर मात्र गृहनिर्माण सोसायटी अथवा अपार्टमेंटची नोंद असते. तसेच सर्व सदनिकाधारकांची एकत्रित नावे त्यावर असतात. या सर्व पार्श्वभूमीवर व्हर्टिकल इमारतींना प्रॉपर्टीकार्ड देण्याचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाकडून २०१९ मध्ये तयार करण्यात आला. मुख्य प्रॉपर्टी कार्डव्यतिरिक्त प्रत्येक सदनिका धारकास पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आली होती. त्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर त्यांची नियमावलीही विभागाकडून तयार करण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही हा प्रस्ताव गेल्या पाच वर्षांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. त्यावर निर्णय घेण्याऐवजी आता शासनाने नव्याने समिती नेमली आहे.
ही समिती नेमताना राज्य शासनाने भूमी अभिलेख या विभागाबरोबरच सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक यांचा समावेश केला आहे. सदस्य सचिव म्हणून महसूल विभागाचे सहसचिव हे काम पाहणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाचे सह सचिव संजय बनकर यांनी काढले आहेत. या समितीला आपला अहवाल एक महिन्याच्या आत शासनास सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
----------
समितीची कार्यकक्षा
सदनिकाधारकांच्या नोंदी सातबारा उतारा अथवा प्रॉपर्टी कार्डवर घेण्यासाठी आवश्यक नियमांचा मसुदा तयार करणे ही या समितीची प्रमुख जबाबदारी आहे. बहुमजली इमारतींमधील सदनिकाधारकांच्या नोंदी घेण्याबाबत इतर राज्यांमध्ये असलेल्या कायद्यांचा सखोल अभ्यास करणे. त्या अनुषंगाने गृहनिर्माण सोसायट्या आणि अपार्टमेन्टमधील सदनिकाधारकांच्या नोंदी मिळकत पत्रिकेवर घेण्याकरिता नियम, कायदा यांचा मसुदा तयार करणे, मसुदा तयार करताना इमारतीखाली जमीन आणि सार्वजनिक वापराचा भाग याच्या नोंदी कशाप्रकारे घेण्यात याव्यात, याबाबत स्पष्टता करणे. यापूर्वी जमाबंदी आयुक्त यांनी सादर केलेल्या प्रस्तावाचाही अभ्यास करणे.
-----------
प्रॉपर्टी कार्डचा फायदा काय होणार
प्रॉपर्टी कार्ड हे महसूल विषयक महत्त्वाचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने सदनिकाधारकांना आता स्वतंत्र पुरवणी प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहेत. त्यामुळे सदनिकाधारकांचे हितसंबंध जोपासले जाणार आहे. प्रॉपर्टी कार्डवर इमारतीखालील सर्व क्षेत्र, तसेच प्रत्येक सदनिकाधारकाचे वैयक्तिक मालकीच्या क्षेत्राची स्वतंत्र नोंद असणार आहे. त्यामुळे सदनिकाधारकाचा जागेवरील हक्क अबाधित राहणार आहे. खरेदी-विक्रीतील फसवणूक टळण्यास मदत होणार आहे. कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
--------
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.