पुणे, ता. १ : संशोधन सुरू ठेवा असं सांगतात, पण घरभाडे आणि प्रवासाचा खर्च कुठून भागवायचा, असा प्रश्न आता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थे (सारथी)अंतर्गत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. संशोधनासाठी निवड होऊन तीन-चार वर्षे उलटून गेली, तरी घरभाडे, इतर खर्च आणि जानेवारी ते जून २०२५ या कालावधीतील अधिछात्रवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. संस्थेकडे निधी उपलब्ध असूनही जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘सारथी’ संस्थेमार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा विद्यार्थ्यांसाठी संशोधन अधिछात्रवृत्ती योजना सुरू केली आहे. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या योजनांचा हेतूच फोल ठरत असल्याची खंत संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी आतापर्यंत तीन वेळा लेखी पत्रव्यवहार केला आहे, तसेच प्रत्यक्ष व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन निधी तातडीने वितरित करण्याची विनंतीही केली. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरात लवकर अधिछात्रवृत्ती आणि अन्य थकबाकी रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याविषयी संशोधक विद्यार्थिनी अपेक्षा निगडे म्हणाल्या, ‘‘शिष्यवृत्ती घेणारे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. संशोधनासाठी लागणारे संदर्भग्रंथ, क्षेत्रभेटी, माहिती संकलन, प्रवास खर्च आणि घरभाडे हे सर्व आम्हाला स्वतः खर्च करून भागवावे लागते. वेळेवर शिष्यवृत्ती मिळाली नाही, तर संशोधनाच्या गतीवर आणि गुणवत्तेवर थेट परिणाम होतो. संशोधनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह टिकवण्यासाठी शासनाने योजना सुरू केल्या. मात्र सारथी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्या योजनांचा मूळ हेतूच निष्फळ ठरत आहे.’’
संशोधन हे केवळ वैयक्तिक प्रगतीचे साधन नसून, समाजाच्या विचारप्रवाहाला दिशा देणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अशा संवेदनशील क्षेत्रात निधी वितरणातील विलंब हा केवळ प्रशासनिक मुद्दा राहात नाही, तर संशोधन संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उभे करतो. या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने तातडीने लक्ष घालून संशोधक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेऊन निधी वितरित करावा.
- एक विद्यार्थी
संशोधन हा आमच्या आयुष्याचा उद्देश आहे, पण निधीअभावी जगणंच अवघड झालंय. संशोधनाच्या नावाखाली आम्ही आर्थिक आणि मानसिक संकटातून जात आहोत. घरभाडे, संदर्भग्रंथ, प्रवास हा खर्च स्वतःच्या खिशातून भागवावा लागत आहे. निधी वेळेवर न मिळाल्यामुळे संशोधनाची गती तर थांबतेच, पण प्रचंड मानसिक ताणही सहन करावा लागतो.
- एक विद्यार्थी
घरभाडे आणि इतर आकस्मिक खर्चासंदर्भात सरकारकडून मार्गदर्शन मागविले आहे, तसेच जानेवारी ते जून २०२५ या कालावधीतील अधिछात्रवृत्तीचा निधी प्राप्त झाला असून विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर संबंधित रक्कम जमा केली जाईल.
- महेश पाटील,
व्यवस्थापकीय संचालक, सारथी
तुमचे मत मांडा...
सारथी संस्थेकडे निधी उपलब्ध असूनही अधिछात्रवृत्ती जमा झालेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. या दिरंगाईमुळे संशोधनावर परिणामही होत आहे. याबाबत तुमचे मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.