पुणे, ता. १२ : बोपोडी येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा इतिहास मोठा ‘रंजक’ असल्याचे पोलिसांनी त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीवरून समोर आले आहे. नायब तहसीलदार ते तहसीलदार पद या सेवेच्या कार्यकाळात चार वेळा त्यांचे निलंबन झाले आहे. पूर्व इतिहास माहिती असूनही अशा अधिकाऱ्याला पुणे शहराचे तहसीलदार करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे आज जिल्हा प्रशासनाला बदनामीला तोंड द्यावे लागत असल्याची नाराजी अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली.
बोपोडी येथील सुमारे १३ एकर जमीन कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात आहे. ही जमीन १९५५ मध्ये रीतसर कृषी महाविद्यालयाच्या मालकीची असल्याचे सातबारा उताऱ्यावरून स्पष्ट होत आहे. मात्र, सूर्यकांत येवले यांनी जमीन प्रकरणात त्यांच्या अधिकार कक्षात नसताना अर्ज दाखल करून घेऊन, त्यावर निकाल दिला असल्याचे प्रकरण उघडकीस आले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याची गांभीर्याने दखल घेत राज्य शासनाला तातडीने अहवाल पाठवला. त्यानुसार एकीकडे येवले यांचे निलंबनही करण्यात आले. दरम्यान, मुंढवा प्रकरणातही येवले यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या दोन्ही प्रकरणात येवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याबरोबरच त्यांनी दिलेले आदेश रद्दबातल करण्याची कार्यवाही देखील सुरू केली आहे.
चौकट
-------------
असे झाले निलंबन
१) २०११ ः उमरेड (जि. नागपूर) येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक
२) २०१४ ः गडचिरोली येथे बदली झाल्यानंतर रुजू होण्यास नकार दिल्याने कारवाईचा बडगा
३) २०१४ ः सिरोंचा (जि. चंद्रपूर) येथे कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकी अडीच लाख घेतल्याचा आरोप. मात्र, काहीही कारवाई झाली नाही.
४) २०१६ ः इंदापूर तहसीलदार म्हणून कार्यरत असताना अवैध वाळू उपशावरून कारवाई
५) २०१६ ः माण- खटाव येथे तहसीलदार असताना बेकायदा वाळू उपशाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून पाच तलाठ्यांसह निलंबन.
वाढता राजकीय हस्तक्षेप....
--------------
येवले यांच्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनावर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागत आहे. एखाद्या अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण प्रशासनच वेठीस धरले जात आहे. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना एक तर अडगळीचे पद दिले जाते. दुसरीकडे अशा ‘सवयी’च्या अधिकाऱ्यांना मात्र, महत्त्वाच्या ठिकाणी आणून ठेवण्यात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.