पुणे, ता. ६ ः विमान प्रवाशांची आर्थिक लूट झाल्यानंतर ‘डीजीसीए’ने (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) शुक्रवारी विमानांच्या तिकीट दरावर कॅपिंगचा (नियंत्रण) निर्णय घेतला. मात्र तोपर्यंत विमान कंपन्यांनी प्रवाशांना अक्षरश लुटले होते. २४ तासांपेक्षा पुण्यासह देशातील विविध विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांनी ५० ते ६० हजार रुपये मोजून सुटकेचा मार्ग निवडला.‘डीजीसीए’ च्या बोटचेपी भूमिकेवर देशभरातून संतापाची लाट पसरली. शुक्रवारी दुपारी विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅपिंगचा निर्णय लागू केला.
‘इंडिगो’ने भारतीय हवाई क्षेत्रात घातलेल्या अभूतपूर्व गोंधळाचा गैरफायदा अन्य विमान कंपन्यांनी घेतला. इंडिगोची विमानसेवा रद्द झाल्यानंतर काही विमान कंपन्यांनी लागलीच मनमानी भाडे आकारले. विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांनी सुटका करून घेण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने त्यांनी उपलब्ध विमानसेवेचा मार्ग निवडला. त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. विमान कंपन्यांनी दरवाढ करू नये अशी सूचना ‘डीजीसीए’ने गुरुवारी (ता. ४) दिली होती. असे असताना विमान कंपन्यांनी सूचनेला बगल देत मनमानी दरवाढ केली.
----------------------
असे असतील दर तिकिटांचे दर :
सरकारने प्रवासाच्या अंतरानुसार कमाल तिकीट दर निश्चित केले आहेत. या कमाल दरांपेक्षा जास्त शुल्क विमान कंपन्यांना आकारता येणार नाही.
५०० किमी पर्यंत : ७ हजार ५०० रुपये
५०० ते १००० किमी : १२ हजार रुपये
१००० ते १५०० किमी : १५ हजार रुपये
१५०० किमीपेक्षा जास्त : १८ हजार रुपये
----------------
प्रवाशांना सूचना :
- हे दर कर आणि इतर शुल्कांव्यतिरिक्त आहेत.
- बिझनेस क्लास व प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम
- ‘उडान’ योजनेतील विमानांना दर मर्यादा लागू असणार नाही.
-----------------
‘‘ऐनवेळी विमान रद्द होणे, सणासुदीचा कालावधी आणि सुट्ट्यांमध्ये विमान कंपन्या प्रवासी भाड्यात मनमानी पद्धतीने वाढ करतात. सर्वसामान्य प्रवाशांचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये आणि हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवासी भाड्यावर मर्यादा लावण्याचा निर्णय घेतला आहे. ५०० ते १५०० किलोमीटर व त्यापुढील अंतरासाठी ठरवलेल्या कमाल भाड्याच्या मर्यादा लागू केल्यामुळे हवाई प्रवास प्रवाशांच्या आवाक्यात राहील आणि प्रवाशांची अनिश्चितता थांबेल.
- मुरलीधर मोहोळ,
राज्यमंत्री, हवाई वाहतूक मंत्रालय,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.