पुणे, ता. ९ : पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात गावठी दारूच्या दोन अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत ३५५ लिटर रसायनासह सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर फाटा परिसरातील राखपसरे वस्तीजवळ दाट झाडीत सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे २२५ लिटर रसायन, साहित्य आणि मिळून १७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच परिसरात आणखी एका ठिकाणी गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणीही छापा टाकला. या ठिकाणी १२० लिटर रसायन जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली.