first tigress in Tadoba to wear radio collar nicknamed Choti Tara animal forest Sakal
सप्तरंग

रुबाबदार 'छोटी तारा'

गळ्यात रेडिओ कॉलरचा पट्टा लावणारी ताडोबातील पहिली वाघीण, असा लौकिक मिळवलेली ‘छोटी तारा’.

अवतरण टीम

- संजय करकरे

गळ्यात रेडिओ कॉलरचा पट्टा लावणारी ताडोबातील पहिली वाघीण, असा लौकिक मिळवलेली ‘छोटी तारा’. ‘वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या वतीने पूर्व विदर्भातील काही निवडक वाघांच्या गळ्यात पट्टा लावून त्यांच्या क्षेत्राचा व त्या वाघांचा अभ्यास केला जात आहे. प्रामुख्याने नर वाघांना हा पट्टा लावण्यात आला होता.

मात्र एखाद्या वाघिणीला या संस्थेच्या वतीने पट्टा लावण्याचा पहिला मान ‘छोटी तारा’ला मिळाला. ती उतारवयाकडे झुकली आहे. तिने आपले साम्राज्य तिच्या दोन मुली, ‘बबली’ व ‘रोमा’ यांच्याकडे सुपूर्द केले आहे. आजही ही वाघीण रस्त्यावरून चालते तेव्हा कोणतेही वार्धक्याचे लक्षण दिसत नाही. तिचा रुबाबदारपणा आजही टिकून आहे.

वन्यजीवांचे आयुष्य कसे असते हे समजणे कठीण आहे. निसर्गात राहत असताना त्यांच्या अनेक गोष्टी आपल्या नजरेआड होत असल्याने त्यांचा जन्म, त्यांची वाढ, त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार, त्यांच्या सवयी, त्यांचे जगणे आणि अर्थातच अन्य प्राण्यांसोबत आणि स्वकियांसोबत असणारे त्यांचे नाते या साऱ्या गोष्टी केवळ कल्पनेद्वारे अथवा अंदाजाद्वारेच समजतात.

प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी उलगडू शकतात. मात्र मुक्त अवस्थेत जगणाऱ्या वन्य प्राण्यांबाबत केवळ अंदाज व आडाखे बांधून त्यांच्या जीवनाच्या वाटचालीचा केवळ अंदाज बांधता येतो. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या कथेतील नायिकेबाबत घडलेला प्रसंग काहीसा असाच अतरंगी म्हणावा लागेल.

गेल्या आठवड्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘रोमा’ या वाघिणीबद्दल लिहिले होते. आजची गोष्ट आहे ‘रोमा’ या वाघिणीच्या आईची, अर्थात ‘छोटी तारा’ (T 7)ची. ताडोबातील ‘माया’पाठोपाठ ‘छोटी तारा’ पर्यटकांना सर्वाधिक दर्शन देणारी म्हणून प्रसिद्ध आहे.

ताडोबा वनपरिक्षेत्रात चांगले रस्ते असल्याने प्रत्येक पर्यटक जिप्सीतून भ्रमंती करतो. तिथे वावरणाऱ्या या वाघिणी साहजिकच ताडोबात येणाऱ्या बहुतांश पर्यटकांना सामोरे जातात, त्यांचे दर्शन होते. या वाघिणींचा बिनधास्तपणा हेही त्यांच्या प्रसिद्धी होण्यामागील एक महत्त्वाचे कारण ठरते.

२००९ च्या सुमारास जन्मलेली ‘छोटी तारा’ खरंतर आता उतार वयाकडे आहे. मात्र अद्यापही ती आपल्या क्षेत्रावरील हक्क कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. या वाघिणीचे मूळस्थान या जंगलातील मोहर्ली वनपरिक्षेत्र आहे.

‘येडा अण्णा’ या नावाचा नर वाघ आणि ‘तारा’ नावाच्या वाघिणीच्या पोटी ‘छोटी तारा’चा जन्म झाला. यावेळी ‘तारा’ या वाघिणीला चार पिल्ले होती. हे कुटुंब त्यावेळेस ‘सर्किट गॅंग’ या नावाने ओळखले जात होते.

 या सर्वांचा वावर मोहर्ली, तसेच ताडोबा वनपरिक्षेत्राच्या काही भागापुरता मर्यादित होता. हे चौघेही मोठे झाले आणि प्रत्येकाने आपापले स्वतंत्र क्षेत्र मिळवले. त्यावेळेस ‘तारा’ या वाघिणीची सर्वात लहान असणारी मुलगी ‘छोटी तारा’ या नावाने ओळखली जाऊ लागली.

या छोटी ताराने सुरुवातीच्या काळात वसंत बंधारा, कोसेकॅनल येथे आणि नंतर जामनीच्या परिसरात आपला मुक्काम हलवला आणि तिथेच ती स्थायिक झाली. जामनीचा हा परिसर वन्यप्राण्यांनी समृद्ध असा आहे.

जामनी तलाव, अंधारी नदीत असणारे बारमाही पाणी व त्याच्या सोबतीने असणारे समृद्ध तृणभक्षी प्राण्यांचे अस्तित्व, त्यामुळे कोणत्याही वाघासाठी हा परिसर निश्चितच नंदनवन ठरतो. या परिसरात मग ‘छोटी तारा’ विविध नर वाघांसोबत राहिली,

ज्यात मटकासुर, रुद्रा, मोगली, ताला, बजरंग आणि अलीकडच्या काळातील ‘युवराज’ या वाघांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर सातत्याने नर वाघांच्या घुसखोरीसाठी प्रसिद्ध असल्याने नेमक्या कोणत्या वाघांसोबत तिचे मिलन झाले हे सांगणे काहीसे अवघडच आहे.

आतापर्यंत या वाघिणीचे सहा वेळा बाळंतपण झाले असून, यातील अनेक पिल्ले घुसखोरी करणाऱ्या नर वाघांकडून मारली गेली. ‘मटकासुर’ या नर वाघापासून तिला झालेला ताराचंद आणि छोटा मटका हे वाघ मोठे झाले आणि त्यांनी आपले क्षेत्र निश्चित केले. 

या वाघातील ‘छोटा मटका’ या वाघाने आज अलिझंझा आणि अन्य बफर क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. ‘ताराचंद’ या वाघाचा बफर क्षेत्रामध्ये शेताला लावलेल्या वीज तारांना लागून मृत्यू झाला होता. यानंतर ‘छोट्या तारा’ला झालेल्या दोन वाघिणी, ज्या ‘बिजली’ आणि ‘रोमा’ या नावाने प्रसिद्ध आहेत, त्यांनीही आपल्या आईच्या क्षेत्रातील काही जागेवर हक्क दाखवून आपले अस्तित्व पर्यटकांना दर्शवले.

‘छोटी तारा’च्या सहाव्या बाळंतपणाबाबत घडलेल्या अकल्पित घटनेबद्दल कोलारा येथील गाईड विनोद उईके सांगतो, ‘‘यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुमारास ९७ नावाच्या एका पाणवठ्यावरती ‘छोटी तारा’ ही वाघीण तिच्या लहान पिल्लांसोबत बघितली.

या परिसरात त्यावेळी ‘मोगली’ व ‘बजरंग’ हे नर वाघही फिरत होते. तिचे हे पिल्लू ‘युवराज’ या नर वाघापासून झालेले होते. या काळात येथे नर वाघांचे भांडण झाले. तसेच ‘छोटी तारा’ने आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठीही या नर वाघासोबत दोन हात केले.

या सर्व गडबडीत तिचे लहान पिल्लू तिच्यापासून दुरावले गेले. ही वाघीण त्यावेळेस आपल्या पिल्लाच्या शोधात सर्वत्र फिरत असल्याचे आम्हाला दिसले. ती कमालीची अस्वस्थ दिसत होती. याच सुमारास छोटी ताराची मुलगी ‘बिजली’ला दोन पिल्ले होती.

त्यातील एक पिल्लू गायब झाले होते. काही काळानंतर छोटी ताराचे पिल्लू ‘बिजली’सोबत दिसायला लागले. हे पिल्लू बिजलीच्या पिल्लापेक्षा मोठे असल्याने पटकन लक्षात आले. आजही ‘बिजली’ या पिल्लाला आपल्यासोबत घेऊन फिरत आहे. अनेक छायाचित्रकारांनी हा निसर्गचक्रातील अनोखा असा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे.’’

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील काही वाघिणींच्या बाबतीत हा प्रकार झाल्याचे लक्षात आले आहे; मार्जारकुळात अशा घटना घडतात. मात्र वाघांच्या आयुष्यात अशा घटना घडणे आणि त्या बघायला मिळणे हा अत्यंत विलक्षण असा प्रकार म्हणता येईल.

अनेक वर्षांपासून ताडोबाच्या जंगलात ‘छोटी तारा’ आपले अस्तित्व दर्शवत असल्याने साहजिकच अनेक वेळा तिला बघितले आहे. मटकासुर, छोटा मटका आणि दुसऱ्या पिल्लांसोबतही ही वाघीण मला जवळून बघता आली आहे.

एकदा डांबरी रस्त्यावर थांबलो असताना दूरवरून चालत येऊन ती पर्यटकांच्या गाड्यांच्या जवळ आली व नंतर गाड्यांच्या घोळक्यातून ती चालत गेल्याचेही मला आठवते. अलीकडेच मी ज्यावेळेस याच डांबरी रस्त्यावरून तिची मुलगी असलेल्या ‘रोमा’ला बघत होतो तेव्हा मला ‘छोटी तारा’च्या स्वभावातील बेधडकपणा ‘रोमा’च्या वागण्यातही प्रतिबिंबित झाल्याचे लक्षात आले.

‘छोटी तारा’च्या आयुष्यात आणखीन एक महत्त्वाची घटना घडली आहे. गळ्यात रेडिओ कॉलरचा पट्टा लावणारी ती ताडोबातील पहिली वाघीण, असा लौकिकही तिला प्राप्त झाला आहे. ‘वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या वतीने पूर्व विदर्भातील काही निवडक वाघांच्या गळ्यात पट्टा लावून त्यांच्या क्षेत्राचा व त्या वाघांचा अभ्यास केला जात आहे.

प्रामुख्याने नर वाघांना हा पट्टा लावण्यात आला होता. मात्र एखाद्या वाघिणीला या संस्थेच्या वतीने पट्टा लावण्याचा पहिला मान ‘छोटी तारा’ला मिळाला. साधारण २०१४ च्या सुमारास तिला बेशुद्ध करून हा पट्टा तिच्या गळ्यात बांधण्यात आला होता. नंतर या पट्ट्यातील बॅटरी संपल्यानंतर २०२० च्या सुमारास हा पट्टा तंत्रज्ञानाच्या साह्याने काढण्यात आला.

आता ‘छोटी तारा’ उतार वयाकडे झुकली आहे. तिने आपले साम्राज्य आपल्या दोन मुली, ‘बबली’ व ‘रोमा’ यांच्याकडे सुपूर्द केले आहे. हा लेख लिहीत असतानाच या महिन्यातील तिचा एक अतिशय सुरेख असा व्हिडीओ फेसबुकवर बघितला. यात ही वाघीण अतिशय दमदारपणे रस्त्यावरून चालत आहे. यात तिचे कोणतेही वार्धक्याचे लक्षण दिसत नाही. इतक्या सगळ्या वाघिणींमध्ये तिचा रुबाबदारपणा आजही टिकून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pushpendra Kulshrestha: डॉ. आंबेडकरांचे उपकार कधीही विसरू नका: अभ्यासक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ; जातीपातीत विभागू नका, डॉ. आंबेडकरांबद्दल काय म्हणाले..

Latest Marathi News Live Update : हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रिमंडळ आज उपराजधानीत होणार दाखल; अतिवृष्टी, आर्थिक स्थितीवरून विरोधक सरकारला घेरणार

दोन शोधमोहिमा अन् अखेर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा...VIDEO बघून तुम्हीही म्हणाल 'जय शिवराय'

Indigo Flight: विमाने जमिनीवर, बुकिंग मात्र जोरात; संभाजीनगरातही ‘इंडिगो’मुळे हाल, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

Right to Disconnect Bill काय आहे? आता कंपन्यांना दंड होणार? पण लागू होण्यासाठी ही आहे मोठी 'अट'

SCROLL FOR NEXT