जागतिक एव्हरेस्ट दिन : सर्वोच्च शिखराने एकेकाळी घेतले होते १५ बळी

नमिता धुरी

हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेले माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वाधिक उंच शिखर आहे. त्याची उंची ८ हजार ८४८ मीटर आणि ८६ सेमी आहे.

२९ मे या दिवशी आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन साजरा केला जातो. सर एदमुंद हिलरी आणि टेन्झिन नॉर्गे शेर्पा यांच्या १९५३ सालच्या पहिल्या चढाईची आठवण म्हणून नेपाळने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के २ अथवा कांचनगंगा या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात.

इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत. आजवर येथे २ हजार ४३६ गिर्यारोहकांकडून ३ हजार ६७९ चढाया झाल्या आहेत.

माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग, व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. या व्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत परंतु ते फारसे वापरले जात नाहीत.

चढाईसाठी सर्वोत्तम महिना मे हा गणला जातो. या काळात थंडी कमी झालेली असते. चढाईसाठी आवश्यक असलेला कडक बर्फ हिवाळ्यानंतर भरपूर असतो. तसेच हवामानातील बदलामुळे वाऱ्याची दिशा उत्तरेकडची होते व त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होतो.

८ मे १९७८ रोजी इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहार्ड मेसनर यांनी ऑस्ट्रियाच्या पेतर हेबलर यांच्या साथीत एव्हरेस्टवर चढाई केली. या चढाईत कोणत्याही प्रकारच्या प्राणवायूच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला नाही. राईनहार्ड मेसनर यांनी पुन्हा १९८० मध्ये एव्हरेस्ट वर पुन्हा एकदा विनाऑक्सिजन एकट्याने चढाई केली.

एव्हरेस्टवर १९९६ च्या चढाईच्या मोसमात एकूण १५ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला व गिर्यारोहकांसाठी सर्वात भयानक वर्ष अशी नोंद झाली. त्यातील ११ मे रोजी सर्वाधिक ८ जण मरण पावले.

२००४ मध्ये कॅनडामधील टोरोंटो विद्यापीठातील डॉ केंट मूर व जॉन सेंपल यांनी अभ्यासांती असा निष्कर्ष काढला की, ११ मे १९९६ रोजी एव्हरेस्ट परिसरात अत्यंत विचित्र हवामान निर्माण झाले होते ज्यामुळे तेथील प्राणवायू फारच विरळ झाला होता. प्राणवायूची पातळी १४ % पेक्षाही खाली आली होती या हवामानात प्राणहानी होणे शक्य असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.