बाहेरच्या खाण्यातून होऊ शकतो शिगेलाचा संसर्ग

नमिता धुरी

श्वारमा खाल्याने एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच केरळमध्ये घडली. तिच्यासोबत आणखी ५० जण हा श्वारमा खाऊन आजारी पडले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या श्वारम्यामध्ये शिगेला बॅक्टेरिया असल्यामुळे असे घडले. त्यामुळे बाहेरचे खाणे खाताना सावध राहाणे आवश्यक आहे.

शिगेला बॅक्टेरियाचा संसर्ग कसा होतो ?

शिगेला हा एक बॅक्टेरियाचा प्रकार असून त्यामुळे आतड्यांना संसर्ग होतो. परिणामी रक्तयुक्त अतिसार होतो. एखादी व्यक्ती शिगेलाग्रस्त व्यक्तीच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यास शिगेलाचा संसर्ग पसरतो. लहान मुलांचे डायपर बदलल्यानंतर किंवा स्वत: शौचास जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ न धुता जेवायला बसल्यास शिगेलाचा संसर्ग होतो.

प्रदूषित अन्न खाल्ल्याने प्रसार

प्रदूषित अन्न-पाण्याचे सेवन केल्याने शिगेलाचा संसर्ग होतो. तसेच न धुतलेल्या भाज्या-फळे खाणे किंवा पोहणे यांमुळेही संसर्ग होतो. थोडाफार संसर्ग असेल तर एका आठवड्यात बरे वाटत; पण संसर्ग एक आठवड्यापेक्षा जास्त टिकला तर उपचारांची गरज भासते. अशावेळी डॉक्टर प्रतिजैविके देतात.

संसर्ग कोणाला होऊ शकतो ?

शिगेलाच्या संपर्कात आल्यानंतर एक-दोन दिवसांनी त्याची लक्षणे दिसू लागतात. आठवड्याभरात तो विकसित होतो. गर्भवती महिला, ५ वर्षांखालील मुले आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्यांना शिगेलाचा सर्वाधिक धोका असतो.

शिगेलाची लक्षणे

शिगेलाचा संसर्ग झाल्यास पोटदुखी, अतिसार, ताप, उलट्या, मळमळ, इत्यादी लक्षणे जाणवतात.

डॉक्टरकडे कधी जावे ?

शिगेलाचे एक जरी लक्षण दिसले तरी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास मृत्यू ओढवू शकतो. निर्जलीकरण, विष्ठेतून रक्त जाणे, वजन कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरकडे जावे. १०१ अंशांपेक्षा अधिक ताप असल्यास रुग्णालयात दाखल व्हावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.