सकाळ डिजिटल टीम
डॉ. मालविका तांबे यांनी तिळाच्या उपयोगावर विस्तृत माहिती दिली आहे.
तीळ रसात थोडे कडवट, मधुर व कषाय असतात, तसेच गुणांनी स्निग्ध व उष्ण असतात व ते कफ व पित्त कमी करायला मदत करतात.
तीळ त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम असतात, शरीरात कुठेही व्रण झालेला झालेला असल्यास लाभकारी असतात, दातांसाठी उत्तम असतात, दीपनीय व मेध्य असतात.
आयुर्वेदात तिळाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसतो. सर्व प्रकारच्या सिद्ध तेलांमध्ये तिळाच्या तेलाचा वापर केलेला दिसतो.
सिद्ध केलेले तीळ तेल अभ्यंगासाठी तर उपयोगी ठरतेच, पण बस्ती, शिरोबस्ती वगैरे बाकी इतर थेरपींसाठीही तिळाचे तेल वापरणे उत्तम सांगितलेले आहे.
अर्शाची समस्या असलेल्यांना रक्तस्राव होत असल्यात तीळ पाण्यात भिजवून त्याचा बनविलेल्या कल्कात लोणी मिसळून २-३ दिवस जेवणाआधी घेतल्यास रक्त पडणे बंद होते असा अनेकांचा अनुभव आहे.
तीळ केसांच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जातात. असे म्हटले जाते की काळ्या तिळाचे तेल केसांना लावले तर केस अकाली पांढरे होत नाहीत, ते काळे, दाट व मऊसर राहतात.
एकूणच आरोग्याच्या दृष्टीने तीळ आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असावेत. मसाल्यांमध्ये कांदा व लसणाचा वापर करण्यापेक्षा वेगवेगळ्या बियांबरोबर तीळ वापरणेही चांगले असते.
भाजलेले तीळ, भाजलेले सुके खोबरे व कढीनिंब, सुक्या लाल मिरच्या वगैर घालून केलेली तिळाची चटणी खाणे उत्तम.