संतोष कानडे
तत्कालीन फ्रेंच सरकारचा गर्व्हनर फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा आधार घेऊन ब्राह्मण कारकूनांनी संभाजी महाराजांना कैद करवून दिलं, असं सांगितलं जातं.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात, संभाजी महाराजांवर शेख निजामने जो छापा टाकला होता, त्याविषयी समकालनीन कागदपत्रांमध्ये एक प्रथम दर्जाचा पुरावा आहे. फ्रान्सिस मार्टिनची डायरी प्रसिद्ध झालेली आहे.
संभाजी महाराजांना फेब्रुवारी महिन्यात कैद केलं होतं. मार्चमध्ये फ्रान्सिस मार्टिनने नोंद करुन ठेवलय की, संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सरकारकुनांनी पकडून दिलं.
एवढंच नाही तर त्याच ब्राह्मण सरकारकुनांनी मोघल सेनापतीशी अगोदरच संधान बांधलं होतं. मारायचं किंवा पकडून द्यायचं, असा कट आधीच रचला होता.
यामध्ये नेमके कोणते सरकारकून कोण होते, याचा उल्लेख सापडत नाही. पण त्यावेळचे ब्राह्मण सरकारकून कोण होते, यांची नावं उपलब्ध आहेत.
इंद्रजीत सावंत पुढे सांगतात, संगमेश्वराचं देशकुलकर्णी पद अन्नाजी दत्तोंकडे होतं. खुद्द संगमेश्वरचं कुलकर्णीपदही अन्नाजी दत्तोंकडे होतं.
परंतु अन्नाजींना हत्तीच्या पायी दिल्यामुळे बरोबरची मंडळी राग धरुन होती. शेख निजाम हा वसमतचा होता, त्याची जहागिरी वसमतची होती. वसमतचं कुलकर्णीपदही अन्नाजी दत्तोंच्या वडिलांकडे होतं.
शेख निजाम हाच संभाजी महाराजांना पकडून घेऊन जातो. या सगळ्या लिंकमध्ये मार्टिनचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो.
इतिहासाच्या अभ्यासाची नवीन द्वारं खुली झाली आहेत. संभाजी महाराजांविरुद्ध मोठा कट झाला आणि त्याच्यात सरकारकून सहभागी होते, असं यातून सिद्ध होतंय, असं सावंत सांगतात.
मात्र त्यांचा हा दावा ज्येष्ठ इतिहास संशोधक विश्वास पाटील खोडून काढतात आणि राजेशिर्के यांनीच संभाजी महाराजांना पकडून दिल्याचे दाखले देतात.