Mansi Khambe
महाराष्ट्रातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात घणसोली आणि शिळफाटा दरम्यानच्या २१ किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचा पहिला भाग तयार झाला आहे.
महाराष्ट्राच्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील हे महत्त्वाचे काम असून ते यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.
भारतात बुलेट ट्रेनची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात आहे. जगातील अनेक देशही या प्रकल्पावर काम करत आहेत. अशातच चीनने बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगवान धावणारी ट्रेन तयार केली आहे.
चीनने बुलेट ट्रेनच्या दुप्पट वेगाने धावणारी ट्रेन बनवली आहे. या ट्रेनला मॅग्लेव्ह ट्रेन असे म्हटले जात आहे, ज्याचा कमाल वेग ताशी ६०० किमी पर्यंत असू शकतो.
मॅग्लेव्ह ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्यं म्हणजे ती सामान्य ट्रेनप्रमाणे रुळांवर धावत नाही, तर हवेत तरंगते. ज्यामुळे सामान्य बुलेट ट्रेनलाही तिचा वेग गाठणे शक्य होणार नाही.
चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या १७ व्या आधुनिक रेल्वे प्रदर्शनात ही ट्रेन प्रदर्शित करण्यात आली आहे. या ट्रेनला चाके नसून ती तिच्या चुंबकीय शक्तीच्या वेगाने पुढे जाते.
या गाड्या चुंबकीय प्रणोदन प्रणाली असलेल्या कमी-व्हॅक्यूम ट्यूबद्वारे चालवल्या जातात, ज्यांचे रुळांशी घर्षण फार कमी होते, ज्यामुळे गाड्या हवेत तरंगत असल्याचे दिसून येते.
चीनने मॅग्लेव्ह ट्रेनचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. त्याची व्यावसायिक वापरासाठी अद्याप चाचणी झालेली नाही. ही ट्रेन चीनच्या विद्यमान रेल्वे सेवांव्यतिरिक्त प्रमुख शहरांमध्ये धावेल.
चीनची मॅग्लेव्ह ट्रेन बीजिंग आणि शांघाय दरम्यानचे १२०० किमीचे अंतर सुमारे दोन तासांत ६०० किमी प्रतितास वेगाने पूर्ण करेल. जर ही ट्रेन भारतात धावली तर दिल्ली ते मुंबई हे अंतर फक्त दोन तासांत पोहोचता येईल.