संतोष कानडे
तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यातलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चर्चेत आलेलं आहे.
रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे तनिषा यांना जीव गमवावा लागला, असा आरोप असून महिला आयोगाने रुग्णालयाविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय साधारण ३५ वर्षांपूर्वी उभं राहिलं. या रुग्णालयासाठी तब्बल ६ एकर जागा दान करण्यात आलेली होती.
भाऊसाहेब खिलारे यांच्याकडे मंगेशकर कुटुंबियांनी रुग्णालयासाठी जागा मागितली होती. शरद पवारांनी भाऊसाहेबांकडे गळ घातली. त्यामुळे त्यांनी ही जागा ट्रस्टला दिली.
भाऊसाहेब खिलारे हे दानशूर होते. ते पुण्याचे माजी महापौर होते. शिवाय पुणे विद्यार्थी गृहाचे ते माजी अध्यक्ष होते.
सप्टेंबर २०१७ मध्ये भाऊसाहेब खिलारे यांची प्राणज्योत मालवली. अनेक समाजोपयोगी कार्यासाठी त्यांनी त्यांच्या जागा दिलेल्या आहेत.
महापालिकेच्या १९६८च्या निवडणुकीत खिलारे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी समाजवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
भाऊसाहेब खिलारे यांनी १९८६च्या सुमारास काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
पुढे १९९१च्या महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली. तेव्हाचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेवाळे यांचा पराभव करून ते महापौर झाले.
याच काळामध्ये ते स्थायी समितीचे अध्यक्ष आणि पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही.