Amit Ujagare (अमित उजागरे)
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतावादी हिंदू धर्माचा त्याग करुन समतावादी बौद्ध धर्म स्विकारला होता.
प्रत्यक्ष बौद्ध धर्मात सामील होण्यापूर्वी लहानपणीच त्यांची केळुस्कर गुरुजींनी भेट दिलेल्या बुद्ध चरित्रामुळं बौद्ध धर्माची ओळख झाली होती.
आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला इथं मी "हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही" अशी ऐतिहासिक घोषणा केली होती.
या घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनंतर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी नागपूर इथं धम्मचक्र प्रवर्तन करत आपल्या लाखो अनुयायांसह प्रत्यक्ष बौद्ध धर्मात प्रवेश केला.
धर्मांतराची घोषणा आणि प्रत्यक्ष धर्मांतराच्या २१ वर्षांच्या कालावधीत त्यांनी इतर धर्मांचाही सविस्तर अभ्यास केला. काही भाषणांमधून आणि 'बहिष्कृत भारत'मधील एका लेखाचा दाखला देताना त्यांना मुस्लिम धर्म स्विकारायचा होता हे आजही सांगितलं जातं. पण हे खरं नाही.
इलाहाबादच्या सोशल सायन्स इन्स्टिट्युटचे प्रोफेसर गोविंद वल्लभ पंत आणि आधुनिक इतिहासकार बद्री नारायण हे सांगतात की, "आंबेडकरांचा इस्लाममधील अनेक चुकीच्या प्रथांना विरोध होता"
बाबासाहेबांना वाटत होतं की, इस्लाममध्ये हिंदू धर्माप्रमाणेच जातींची उतरंड असून इथंही दलितही उपेक्षितच आहेत. तसंच हिंदूंमधील गुलामगिरीसारखी प्रथा इस्लाममध्ये असून ती नष्ट करायला त्यांच्याकडं विशेष कटिबद्धता दिसत नाही.
त्याचबरोबर इस्लाममधील महिलांच्या स्थितीबाबतही आंबेडकर चिंतेत होते. बहुपत्नीत्व प्रथेच्या ते विरोधात होते, यामुळं महिलांचं शोषण होतं त्यांच्यावर दडपशाही केली जाते, अशी त्यांची धारणा होती.
शम्सुल इस्लाम आणि बद्रीनारायण या इतिहासकारांच्या मते, "जे मुस्लिम शासक भारतात आले त्यांनी ब्राह्मणवादी राजकारण स्विकारलं होतं. मुघल काळात मुस्लिम शासकांनी हिंदू धर्मातील उच्च जातींसोबतही सत्ता राखण्यासाठी करार केला होता. याला बाबासाहेबांचा प्रखर विरोध होता"
त्यामुळं सुरुवातीच्या काळात हिंदू धर्मातील स्पृश्य समाजाला इशारा देण्यासाठी जरी त्यांनी आपल्या लिखाणामध्ये इस्लाम धर्माचा उल्लेख केला असला तरी अखेर सखोल चिंतनानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्विकारला होता.